Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिकासोबत प्रेमाची कबुली कधी देणार?; विजय म्हणाला, "मी त्याच दिवशी सांगेन जेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:23 IST

विजय देवरकोंडाने सांगितली 'ती' वेळ, ज्या दिवशी तो प्रेमाची कबुली देणार

अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा नेहमीच जोर धरुन असतात. दोघांनी अजूनही त्यांचं नातं स्वीकारलेलं नाही. मात्र चाहत्यांनी अनेकदा दोघंही एकत्र असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. कधी मालदीव्ह व्हॅकेशन तर कधी हॉटेलमध्ये डिनर करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांनी कायम हे नातं जगासमोरुन लपवून ठेवण्याचाच प्रयत्न केला आहे. मात्र आता विजय देवरकोंडाने या नात्याबद्दल सर्वांना कधी सांगणार याचा खुलासा केला आहे.

अनेक तरुणींचा क्रश विजय देवरकोंडा 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानावर फिदा आहे हे आता सगळ्यांनाच माहित आहे. विजयने नुकतंच बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "मी याविषयी तेव्हाच बोलेन जेव्हा मी पूर्णपणे तयार असेन. जेव्हा मला वाटेल की जगाला याबद्दल माहिती देण्याची गरज आहे आणि मी हे सगळ्यांना सांगू शकतो असं वाटेल तेव्हाच मी शेअर करेन. यासाठी काहीतरी कारण किंवा तसा प्रसंग आणि वेळ असली पाहिजे. त्या दिवशी मी आनंदाने माझ्या पद्धतीने याबद्दल सांगेन."

तो पुढे म्हणाला, "मला माहित आहे की चाहत्यांना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. जेव्हा तुम्ही एक पब्लिक फिगर असता तेव्हा हा तुमच्या कामाचाच भाग असतो. मला कधीच याचा दबाव वाटला नाही. मी याला एक बातमी म्हणून वाचतो. एकदाच असं झालं होतं की मला प्रतिक्रिया देण्याची गरज भासली होती. ते सोडलं तर बाकी कधीच नाही."

मध्यंतरी विजय आणि रश्मिकाच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्यावेळी त्याने इन्स्टाग्राम पोस्ट करुन या बातम्यांचं खंडन केलं होते. रश्मिका नुकतीच 'पुष्पा २' मध्ये दिसली. शिवाय तिचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमाही रिलीज होत आहे. या सिनेमाच्या इंट्रोला विजयनेच आवाज दिला आहे. 

टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानारिलेशनशिपTollywood