'छावा' सिनेमाबद्दल जो वाद सध्या सुरु आहे त्यावर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि इतिहासतज्ञ त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अशातच 'छावा' सिनेमाच्या वादग्रस्त दृश्यांबद्दल आणि सिनेमांसंबंधात बोलण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन लावला आणि म्हणाले की, "मी छावाचा ट्रेलर बघितला मी. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना देवाच्या ठिकाणी मानतो."
उदयनराजे फोनवर पुढे म्हणतात की, "त्यामुळे कसं होतं की, अनेकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात की हे नको - ते नको. आपण जे सिनेमाचं दिग्दर्शन केलंय ते सुंदरच आहे. त्यातले एखाद दुसरे जे सीन असतील ते आपण इतिहासतज्ञांना विचारात घेऊन केलं तर जो सध्या वाद निर्माण झालाय तो संपून जाईल. आणि हा पिक्चर खरंच म्हणजे भावी पिढीला दाखवणं गरजेचं का आहे कारण आयुष्यात पुढे वाटचाल करत असताना मागचा जो इतिहास आहे तो विसरुन चालणार नाही. कारण इतिहास हा आपल्या सर्वांचा शिक्षक आहे."
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याकडून इतक्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत की एकप्रकारची प्रेरणा मिळते. त्यामुळे मला वाटतं की लेझीमच्या दृष्यावरुन जे काही झालं असेल किंवा इतर कोणत्याही दृश्याबद्दल आक्षेप असेल तर त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सिनेमा रिलीज करावा. कारण शेवटी सिनेमाच्या मागे कलाकार असतात, दिग्दर्शक असतात, निर्माते असतात. त्यामुळे बोलणं सोप्प असतं पण करणं कठीण असतं.