Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी सत्य बाहेर आणू शकते'; पूर्वाश्रमीच्या पतीवर आरोप करणाऱ्या स्नेहाला काम्याने फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:27 IST

Kamya panjabi slams sneha wagh: स्नेहाने पूर्वाश्रमीच्या पतींवर केलेले आरोप ऐकून अभिनेत्री काम्या पंजाबी चांगलीच संतापली असून तिने स्नेहावर टीकास्त्र डागलं आहे.

ठळक मुद्दे'बिग बॉस मराठी ३'मध्ये स्नेहा वाघसोबतच तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकरदेखील सहभागी झाला आहे.

'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र, केवळ ३ दिवसांमध्येच या शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे या 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केल्यापासून घरातील स्पर्धकांनी त्यांचा ड्रामा सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. घरात पाय ठेवताच क्षणी मीरा जगन्नाथने इतर सदस्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. तर, स्नेहा वाघने तिच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला. यामध्येच स्नेहाने तिच्या दोन वेळा मोडलेल्या संसारावर भाष्य केलं. मात्र, तिने पूर्वाश्रमीच्या पतींवर केलेले आरोप ऐकून अभिनेत्री काम्या पंजाबी चांगलीच संतापली असून तिने स्नेहावर टीकास्त्र डागलं आहे.

'बिग बॉस मराठी ३'मध्ये यावेळी स्नेहा वाघसोबतच तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकरदेखील सहभागी झाला आहे. १९ व्या वर्षी स्नेहाने अविष्कारसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. ते काही वर्षांमध्येच विभक्त झाले. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही जोडी समोरासमोर आली आहे. त्यातच स्नेहाने एका मुलाखतीत तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचं कारणदेखील सांगितलं होतं. मात्र, तिची कारणं काम्याला फारशी पटलेली नाहीत. यावर काम्याने ट्विट करत स्नेहावर निशाणा साधला आहे.

Bigg Boss Marathi 3 : 'या' कारणामुळे तृप्ती देसाईंनी घेतला बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय

तुला 'बिग बॉस'मध्ये सहभागी व्हायचं होतं ही चांगलीच गोष्ट आहे. त्यानुसार तू आलीस सुद्धा. पण, विक्टीम कार्ड कशाला खेळतेस? तुझ्या पहिल्या लग्नाविषयी काही कल्पना नाही. पण, निदान तुझ्या दुसऱ्या लग्नाविषयी तरी काहीही काहाण्या करुन सांगू नकोस. ते सुद्धा केवळ या चार दिवसांच्या खेळासाठी. तुला चांगलंच माहितीये मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळू नकोस, असं ट्विट करत काम्याने स्नेहाला फटकारलं आहे. 

दरम्यान, १९ व्या वर्षी अविष्कारसोबत स्नेहाने लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले. यावेळी स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ७ वर्षाने तिने इंटेरियर डिझायन अनुराग सोलंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्न जवळपास आठ महिनेच टिकलं आणि स्नेहाने अनुरागसोबतही घटस्फोट घेतला. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकाम्या पंजाबीस्रेहा वाघसेलिब्रिटी