कॉमेडियन समय रैनाविरोधात (Samay Raina) संतापाची लाट उसळली आहे. त्याचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात अडकला आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह जोकनंतर हा वाद सुरु झाला. तो एपिसोडही युट्यूबवरुन हटवण्यात आला आणि समय-रणवीरविरोधात तक्रारही दाखल झाली. परिणामी समयने हे सर्व पाहतात त्याच्या शोचे सगळेच एपिसोड डिलिट केल्याचं काल स्टोरी शेअर करत सांगितलं. या सगळ्यात आता एका टीव्ही अभिनेत्याने समयला पाठिंबा दिला आहे.
एकीकडे सर्वच समयविरोधात असताना टीव्ही अभिनेता अली गोनीने (Aly Goni) मात्र समयला पाठिंबा दिला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले, "समयला बळजबरी लेटेंटचे सगळे एपिसोड डिलिट करावे लागले आहेत. ही चांगली गोष्ट नाही...फक्त तो एकच एपिसोड डिलिट करणं ठीक होतं...त्याने हा शो यशस्वी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती...काही दिवसांपूर्वी तर सगळे त्याचं एवढं कौतुक करत होते आणि आता सगळे त्याच्या विरोधात आहेत..काय यार..."
अलीच्या या ट्वीटवर युजर्सने त्यालाच सुनावलं आहे. 'मेहनत?', 'कोणीही पालकांविरोधात काहीही बरळतो आणि हा मुलगा हसताना दिसतो. तू त्याची बाजू कशी काय घेऊ शकतोस?','रणवीर कडून तू २ कोटी घेतलेस का?' अशा प्रकारे युजर्सने अलीच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या वादानंतर समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया तसंच शोमध्ये उपस्थित इतर कॉमेडियन्सची चौकशी करण्यात आली. पोलिस रणवीरच्या घरीही गेले होते. इतकंच नाही तर आता समय रैनाचे गुजरातचे सगळे लाईव्ह शोज रद्द झाले आहेत.