Join us

वाढदिवस अन् प्रेमाची भाकरी...; अभिनेत्री कल्याणी कुरळेनं शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 14:59 IST

Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक भुमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक भुमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर होलोंडी येथील खाऊ गल्लीमध्ये कल्याणीने पंधरा दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. आठवड्यापूर्वीच कल्याणीने वाढदिवस साजरा केला होता.

वाढदिवसानिमित्त कल्याणीने एक व्हिडीओ शेअर केला होता.  तिच्या निधनानंतर तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.

या पोस्टमध्ये कल्याणी हसतेय, खिदळतेय, प्रेमाची भाकरी थापताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे. आठवड्यापूर्वी अशी प्रेमाची भाकरी थापणारी कल्याणी सर्वांना सोडून अकाली या जगातून निघून जाईल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. ‘प्रेमाची भाकरी. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला...मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली... मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असू देत .. मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या...,’असं तिने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. काल शनिवारी  हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, काल रात्री कल्याणीने तिचे आईवडिल आणि मुलाला जेवणासाठी हॉटेलमध्ये बोलावलं होतं. मनसोक्त गप्पा मारत कल्याणीने कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर 11 च्या सुमारास कल्याणी हॉटेल बंद करून कुटुंबीयांसह बाहेर पडली. कल्याणी आपल्या दुचाकीवरून घरी निघाली तर पाठोपाठ तिचे आईवडील व मुलगा रिक्षातून निघाले. यावेळी सांगली कोल्हापूर रस्त्यावर कल्याणीच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. आईवडिल व मुलाच्या समोरच हा अपघात झाला. या अपघातात कल्याणीचा जागीच मृत्यू झाला.

 कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत  तिने सहाय्यक  भूमिका साकारली होती.  सन मराठी  या वाहिनीवरील  दख्खनचा राजा ज्योतिबा  या मालिकेतही काम केले होते.  

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमराठी अभिनेतामृत्यूकोल्हापूर