उद्योजकांना प्रोत्साहन आणि फंडींग देण्यासाठी सुरू झालेल्या शार्क टँक सिझनमध्ये आता सेलिब्रिटींचीही एंट्री होऊ लागलीय. सोनी टीव्हीवरील हा बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India 2) दुसरा सीझन मोठी लोकप्रियता मिळवत आहे. या शोमध्ये एकापेक्षा जास्त उद्योजक येतात आणि त्यांची बिझनेस आयडिया सांगून फंड मिळवण्याचा प्रयत्न करतात. शार्क टँक शोचे जजेस नवीन उद्योजकांमध्ये गुंतवणूक करतात. हा शो उदयोन्मुख उद्योजकांना एक व्यासपीठ देतोय. मात्र, काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये शोची जज असलेल्या विनिता सिंगची एंट्री पाहायला मिळाली. त्यानंतर, आता या सिझनच्या शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री पारुल गुलाटीचं उद्योजक बनून आगमन झालं होतं.
शार्क टँक या शोला चांगली प्रसिद्धी मिळाली असून सोशल मीडियावरही हा शो ट्रेंडींग असतो. अनेकदा यातील काही भाग व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच स्वत: विनिता सिंग पतीसह शोमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर, आता अभिनेत्री पारुल गुलाटीने उद्योजक बनून एंट्री केलीय. विशेष म्हणजे ती या शोमधून १ कोटी रुपयांचं फंडीग मिळवण्यात यशस्वीही ठरली. मात्र, तिचे स्पीच आणि एपिसोड पाहिल्यानंतर नेटीझन्सने तिला ट्रोल केलंय. उद्योगपती अमित जैनने पारुलला १ कोटी रुपयांचा चेक दिला आहे. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवरुन व्हिडिओही शेअर केलाय.
निश हेअर नावाने पारुलचा हेअर विगचा बिझनेस असून तिच्या कंपनीचं सर्वच शार्कने कौतुक केलंय. तर, अमित जैन यांनी २ टक्के इक्विटीच्या बदल्यात १ कोटी रुपयांचा चेकही देऊ केला. तिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला असून अमित जैन हा आपला बिझनेस हिरो असल्याचे तिने म्हटले. मात्र, सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलंय. नेटीझन्सने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत, हा पब्लिसीटी स्टंट असल्याचे म्हटले. तसेच, काहींनी हा स्क्रिप्टेड ड्रामा असल्याचे सांगत तिला ट्रोल केलंय. ज्यांना खरंच गरज होती, अशा नवयुवकांना उद्योगासाठी फंडी दिली असती तर बरं केलं असतं, अशाही कमेंट काही नेटीझन्सने केल्या आहेत.