श्रावण महिना म्हटलं की, अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल सुरु होते. त्यातच या महिन्यातील बहीण-भावाचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट प्रत्येक बहीण मोठ्या आतुरतेने पाहात असते. त्यामुळे हा सण बऱ्याचदा चित्रपट, मालिकांमध्येही दाखवला जातो. विशेष म्हणजे कलर्स मराठीवरील ''योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेमध्येही हा सण साजरा केला जाणार आहे.
मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे या खास भागासाठी मालिकेत एका नव्या बालकलाकाराची एन्ट्री होणार आहे. 'स्वामिनी' मालिकेत रमा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली सृष्टी पगारे योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत पावनी ही भूमिका साकारणार आहे.
मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार असून त्यांचीच मुलगी पावनी आहे. पावनीला तिचा भाऊ परत येईल असं वाटतं आणि त्याचा भासही होतो. त्यामुळेच पावनीचे हे भास खरे आहेत का ? तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का ? बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील ? हे सगळे मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.
"मी या भूमिकेसाठी खूपचं उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळतं आहे हे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा," असं सृष्टी तिच्या भूमिकेविषयी म्हणाली.