अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्याबरोबर प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत यावर आपली बाजू मांडली.
प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत घेतल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा तिला पाठिंब मिळत आहे. अनेक कलाकारांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताचं समर्थन केलं आहे. आता अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही प्राजक्ताला खंबीर साथ दिली आहे. विशाखाने या प्रकरणाबद्दल फेसबुकवरुन पोस्ट करत प्राजक्ताला मी तुझ्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. "प्राजक्ता माळी...मी तुझ्यासोबत आहे! आपल्या जीवावर भाषणं करावी. दुसऱ्याचं नाव विनाकारण गुंफणं हे माणुसकीला धरून अजिबातच नाही. मी निषेध करते ह्या वाक्याचा!", असं विशाखाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्राजक्ताने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. प्राजक्ताने सुरेश धस यांना जाहीर माफी मागण्यास सांगितली आहे. त्याबरोबर प्राजक्तावर आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांनाही तिने खडे बोल सुनावले आहेत.