Vishakha Subhedar: वेगवेगळ्या मराठी मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून काम करत अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांनी स्वतःच्या अभिनयाचा ठसा चाहत्यांच्या मनावर उमटवला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'फु बाई फू' या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरात लोकप्रिय झाली. विनोदाचं अचून टायमिंग साधत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिकेत रागिणी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करताना कुटुंबीयांची साथ असणं ही महत्वाची गोष्ट असते. विशाखा सुभेदार यांना सुद्धा त्यांच्या या अभिनय प्रवासात पतीसह मुलाने खंबीरपणे पाठिंबा दिला. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विशाखा यांच्या लेकाने त्यांच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर लेकासोबत केलेल्या चॅटिंगचा स्क्रिनशॉट विशाखा यांनी पोस्टसोबत जोडून त्यामध्ये लिहलंय, "जेव्हा मुलगा आईचं कौतुक करतो! अभिनय लहानपणापासूनच समीक्षकाची भूमिका वठवत आलाय. काय चांगल,काय वाईट हे नेहमीच त्याने मला बेधडक सांगितलंय. त्याला पाठ झालीय मी. आणि रागिणी तर त्याने डायरेक्शन टीम मध्ये राहून जवळ-जवळ दीडवर्षे जवळून पाहिली आहे. वेगळं काहीतरी शोधणं, हे दोघांनाही आवडतं ते वेगळेपण मिळालं कीं त्याच्याकडून ही शाब्बासकीं मिळते, त्यामुळेच तर त्याची ही रिअॅक्शन माझ्यासाठी खास आहे...! Thank u अभिनय!"
दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा लाडका लेक शिष्यवृत्ती मिळवून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. अभिनय असं त्यांच्या लेकाचं नाव आहे.