Join us

"घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:33 IST

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी कलाविश्वातील दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप; म्हणाले- "३८ वर्षे झाली परिस्थिती आजही..."

Vaishnavi Hagawane Death Case: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णली हगवणे हिने  १६ मे रोजी राहत्या  घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची एक घटना समोर आली.  सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवीने हे टोकाचं पाऊल उचललं असा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. या प्रकरणाचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. अशातच या दुर्दैवी घटनेवर महाराष्ट्राची हास्यजत्रा चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, “खेळ हुंड्याचा “या नावाची प्रा.भगवान ठाकूर लिखित एकांकिका मी १९८७ साली केली होती.त्या वेळी हुंडाबळी ची समस्या ज्वलंत वाटायची.आणि नाटक हे परिवर्तनाचे महत्वाचे साधन वाटायचे. ३८ वर्षे झाली परिस्थिती आजही तशीच आहे, नाटक परिवर्तन घडवतं या भ्रमातून मी मात्र बाहेर आलोय. समाजातील तळागाळातील,अशिक्षित घटकात ही कुरीती आहे असे वाटत असतानाच, उच्च वर्ग ,सुशिक्षित मंडळी ही या व्याधीने ग्रस्त आहे ,हे वास्तव बाहेर आलं.

त्यानंतर पुढे त्यांनी लिहिलंय, "सरकार,कायदा,नैतिक जाणीव या सगळ्यांना मुठमाती देऊन घरातील सुनेचा जीव घेतला जातो.आणि एक सणसणीत बातमी ते दाबले गेलेले प्रकरण होऊन हा विषय तेव्हड्यापुरता संपतो. आणि आपण हतबल होऊन मूकपणे हे पाहत राहतो.. अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे हे…" अशा शब्दांत त्यांनी त्यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :वैष्णवी हगवणेटिव्ही कलाकारपुणेगुन्हेगारी