Join us

आईचा विरोध झुगारुन पहिल्यांदाच पशा देणार अंजीची साथ; दोघांच्या नात्याला मिळणार नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:51 IST

Sahkutumb Sahparivar: या घरात आनंदाचं वातावरण आहे. तर, दुसरीकडे पशा आणि अंजी यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार'. ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत मोरे कुटुंबात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच अवनीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यातच सरितालादेखील दिवस गेले आहेत. त्यामुळे या घरात आनंदाचं वातावरण आहे. तर, दुसरीकडे पशा आणि अंजी यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत आहे. यामध्येच आता आईचा विरोध झुगारुन पशा चक्क अंजीची बाजू घेताना दिसणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पशा,सूर्या यांच्या आईची मालिकेत एन्ट्री झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांची आई प्रचंड शिस्तीची असून घरात त्यांचा रुबाब आहे. यामध्येच गावातील काही जण अंजीने त्यांच्या नाटकात काम करावं अशी विनंती मोरे कुटुंबासमोर करतात. परंतु, आई या गोष्टीसाठी साफ नकार देते.

आमच्या घरातील सूना अशा नाटकात वगैरे काम करत नाहीत, असं म्हणत आई अंजीसमोर आलेला प्रस्ताव धुडकावून लावते. परंतु, एक नवरा म्हणून माझी तुला साथ आणि परवानगी आहे. तू बिंधास्तपणे नाटकात काम कर असं पशा अंजीला सांगतो. 

दरम्यान, अंजीसाठी पहिल्यांदाच पशाने त्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे अंजी पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडली आहे. परंतु, आईचा विरोध झुगारुन पशा कसं काय या नव्या आव्हानाला सामोरं जाणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार