Join us
Daily Top 2Weekly Top 5

Veena Kapoor : नवा ट्विस्ट! "माझ्या मुलाने माझी हत्या केली नाही"; अभिनेत्री वीणा कपूर जिवंत; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:30 IST

Veena Kapoor : वीणा कपूर यांच्या निधनाची वृत्त झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वीच एक भयंकर बातमी समोर आली होती. टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलाने संपत्तीसाठी त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील याप्रकरणी एकाला अटक केली होती. पण आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ज्या अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त सगळीकडे पसरलं होतं ती जिवंत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून आपण जिवंत असल्याची माहिती दिली.

निधन झालेल्या महिलेने अशाप्रकारे पोलिसात तक्रार दाखल करणं हे ऐकायला विचित्र वाटत असेल पण हो हे खरं आहे. काही दिवसांपूर्वी हत्या झालेली महिला या अभिनेत्री वीणा कपूर नव्हत्या तर जुहू भागात राहणारी एक महिला होती जिचं नाव देखील वीणा कपूर होतं. त्यांचा मुलगा सचिन कपूरने त्यांची हत्या केली होती. दोघीचंही नावं एकसारखंच असल्याने गोंधळ उडाला आणि मृत महिला या अभिनेत्री वीणा कपूर असल्याचं वृत्त पसरलं होतं.

वीणा कपूर यांच्या निधनाची वृत्त झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांच्या मुलालाही सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. आता अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. वीणा कपूर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना सांगितलं की, "मी जिवंत आहे मात्र माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीचं वृत्त पसरवलं जात आहे."

"सोशल मीडियावर मला श्रद्धांजली देण्यात आली आणि माझ्या मुलालाही अपमानित करण्यात आलं आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला आहे." तसेच मीडियाशी संवाद साधताना "मी खूप त्रासले आहे. माझे फोटो व्हायरल झाले आहेत. मला लोक श्रद्धांजली देत आहेत. लोकांचे फोन येत आहेत. मला माझ्या कामावरही लक्ष देता येत नाही आहे. त्यामुळे आता मी सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या मुलाने माझी हत्या केलेली नाही. मी जिवंत आहे आणि माझ्या निधनाची वृत्त ही केवळ अफवा आहेत. या खोट्या अफवांमुळे मला काम मिळणं बंद झालं आहे" असं वीणा कपूर यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :टेलिव्हिजनगुन्हेगारी