सिनेइंडस्ट्रीतील लग्न आणि घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. टेलिव्हिजन विश्वातील आणखी एका कपलचा घटस्फोट झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता वरुण कपूरचा संसार मोडला आहे. वरुणने त्याच्या पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबतचं नातं कायमचं मोडलं आहे. वरुणने पत्नी धान्या मोहनला घटस्फोट दिला आहे. त्यांच्या १२ वर्षांच्या संसाराचा काडीमोड झाला आहे.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच वरुण कपूर आणि धान्याचा घटस्फोट झाला आहे. मात्र, अद्याप वरुणने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१३ मध्ये दोघांनीही लग्न केलं होतं. पण, आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. वरुणने 'स्वरागिनी', 'सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातही तो दिसला होता.
वरुणने एका मुलाखतीत त्याच्या आणि धान्याच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. "धान्या नेहमी कुठे ना कुठे प्रवास करत असते. आणि मी नेहमी शूटिंगमध्ये असतो. लग्नानंतर हे सगळं होईल, हे आम्हाला आधीच माहीत होतं. मला कधीकधी असं वाटतं की मी सिंगल आहे. महिन्यातले १५ दिवस मी एकटाच घर सांभाळतो", असं तो म्हणाला होता.