कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जोधा एकबर फेम अभिनेता रवी भाटिया याच्या गाडीचा भयानक अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अभिनेत्याच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने त्याचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावरुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
१० फेब्रुवारीला रवी भाटियाच्या कारचा हा अपघात झाला. मड रोड येथे ही घटना घडली. अभिनेत्याने एक्स अकाऊंटवरुन एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याने अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीचे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या कारची वाईट अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. या अपघातात कोणलाही दुखापत झाली नसल्याचंही रवी भाटियाने सांगितलं आहे. ट्विटमध्ये रवी भाटियाने म्हटलं आहे की "१० फेब्रुवारी रोडी मड रोड येथे माझ्या कारचा मोठा अपघात झाला. गाडीतल्या एअर बॅग्स वेळीच ओपन झाल्या. गाडीची अवस्था पाहता मी जिवंत आहे यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. यासाठी मी रतन टाटा सर यांचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. कोणालाही दुखापत झालेली नाही".
रवी भाटियाने ईटाइम्सशी बोलताना हा अपघात कसा झाला याबाबत सांगितलं. तो म्हणाला, "आम्ही अक्सा बीचला जात असताना माझ्या कारला टेम्पोची धडक बसली. त्याआधी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास माझी कार दोनदा भितींला धडकली होती. देवाच्या कृपेने मला जास्त दुखापत झालेली नाही. काही किरकोळ जखमा झाल्या आहेत, ज्या आता बऱ्या होत आहेत. मोठी दुर्घटना घडली नाही हे आमचं सुदैव. पण, यात माझ्या कारचं खूप नुकसान झालं आहे".
रवी भाटिया हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘लाल इश्क’, ‘इश्क सुभानल्लाह’, ‘हसरतें’, ‘हमारी बेटी राज करेगी’, ‘चिट्ठी’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’ आणि ‘सीआयडी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. जोधा अकबर मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.