'ठरलं तर मग' ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. मालिकेत सायली-अर्जुनच्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार आहे. आश्रममध्ये झालेल्या खूनात मधूभाऊंची निर्दोष सुटका होणार आहे. तर साक्षी यामध्ये दोषी ठरणार आहे. त्यासोबतच साक्षीला मदत केल्याने प्रियालाही शिक्षा होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. सध्या मालिका रंजक वळणावर आहे. पण, यासोबतच 'ठरलं तर मग' नवीन वळण घेणार असल्याचं बोललं जात आहे.
आश्रममध्ये झालेल्या खूनात साक्षीला जन्मठेपेची तर प्रियाला ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा कोर्ट सुनावतं. याचा प्रोमो समोर आला आहे. पण, प्रिया जर ७ वर्ष जेलमध्ये गेली तर मग मालिका कशी पुढे चालणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोन्ही व्हिलन जेलमध्ये मग मालिकेत काय होणार? त्यामुळेच आता मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे.
'ठरलं तर मग' मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसतंय की प्रियाला पोलीस घेऊन जात असतानाच पूर्णा आजी, सायली तिच्या कानाखाली मारते. प्रिया सायलीला म्हणते की मला जेलमध्ये जायचं नाही. सायली तिला म्हणते आता ७ वर्ष जेलमध्ये सडायचं. हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे. या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "प्रियाला ७ वर्ष शिक्षा, साक्षी पण जेलमध्ये मालिका कशी चालणार? सात वर्षाचा लीप घेणार का?" अशी कमेंट एकाने केली आहे.
"७ वर्षाचा लीप येणार", "प्रियामुळे मालिकेला मजा आहे", "७ वर्षांचा लीप येणार आहे ११३ %", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. त्यामुळे मालिकेत आता कोणतं नवं वळण येणार हे पाहायला मजा येणार आहे.