दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. १० दिवस गणरायाची मनोभावे पूजा करून शनिवारी(६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी येथे मूर्तींचे विसर्जन करण्यात आलं. पण, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र किनाऱ्यावर विसर्जित केलेल्या मूर्तींचे काही अवशेष आणि कचराही पाहायला मिळाला. यामध्ये मोठ्या मूर्तींचाही समावेश होता. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विसर्जनानंतरची किनाऱ्यावरची परिस्थिती पाहून मराठी अभिनेत्रीने दु:ख व्यक्त केलं आहे. ठरलं तर मगमध्ये तन्वीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गणपती बाप्पाच्या मोठ्या मूर्ती समुद्र किनाऱ्यावर येऊन पडल्याचं विदारक दृश्य दिसत आहे. "जर तुम्हाला बाप्पाचं योग्यप्रकारे विसर्जन करता येत नसेल तर मोठ्या मूर्ती आणूच नका. हे सगळं बघून सगळ्यांना वेदनांशिवाय काहीच मिळत नाही", असं या व्हिडीओत म्हटलं गेलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियाने "हे खूप वाईट" असल्याचं म्हटलं आहे.
ठरलं तर मग या मालिकेत प्रियांका प्रिया नावाचं पात्र साकारत आहे. प्रियांका साकारत असलेली खलनायिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. सध्या प्रिया खूनाच्या खटल्यात जेलमध्ये आहे. तर महिपत तिला मारण्यासाठी जेलमध्ये प्रयत्न करत असल्याचं मालिकेत दाखवण्यात येत आहे.