Jui Gadkari: जुई गडकरी (Jui Gadkari) ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीची नायिका आहे. जुईचा चाहतावर्ग फार मोठा आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या ठरलं तर मग या मालिकेत साध्या, सोज्वळ सायलीच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. या मालिकेतील तिच्या अभिनयाची सर्वदूर चर्चा आहे. त्यात आता अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत जुई गडकरीनेसोशल मीडियावरील फॉलोअर्स पाहून काम देण्याच्या त्या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे.
नुकतीच जुई गडकरीने 'मराठी मनोरंजन विश्व' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये जुई गजकरीला हल्ली सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं, तुला अशा परिस्थितीचा कधी सामना करावा लागला आहे का? याचं उत्तर देताना जुई म्हणाली, "आता तसं बघायला गेलं ना तर स्टारवरती जेवढ्या लीड नायिका आहेत. त्या सगळ्यांपेक्षा माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत आणि मी फॉलोअर्स वाढवण्यासाठी कुठलीही वेगळी अॅक्टिव्हिटी करत नाही. पण, सगळ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती मी केल्या आहेत. माझं इन्स्टाग्राम अकाउंट जर पाहिलं तर मी सगळ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करतेय आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. माझा रिच, माझे व्ह्यूज त्या सगळ्यांपेक्षा जास्त आहेत ज्यांचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त आहेत. मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही फॉलोअर्स वाढवण्याच्या मागे लागू नका. तुम्ही तुमचं काम जास्त प्रामाणिकपणे करा, ब्रॅण्ड्स तुमच्या मागे येणार. मी जसं म्हणत असते की, माझी फॅनफॉलोइंग किती आहे? सायलीची किती क्रेझ आहे? मी त्याकडे लक्षच देत नाही. मी माझं काम दोनशे टक्के प्रामाणिकपणे करते. "
त्यानंतर जुई म्हणाली, "हे चुकीचं आहे. तुम्ही सोशल मीडियावरील फॉलोअर्सवरती एखाद्या व्यक्तीचं टॅलेंट ठरवू शकत नाही, आणि ते ठरवू नये. कारण इन्फ्लूएन्सर्स वैगेरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. कलाकार हे त्यांची वेगळी मेहनत करत असतात. तर इन्फ्लूएन्सर्स त्यांची वेगळी मेहनत करत असतात. तर या दोघांची तुलना करुन एखाद्याचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून अॅक्टिंगमध्ये इन्फ्लूएन्सर्स घेणं हे मला पटत नाही. कारण, असे किती कलाकार, मुलं आहेत जे वर्षानुवर्ष मेहनत करुनही फॉलोअर्स कमी असल्याने त्यांना काम मिळत नाही, हे चुकीचं आहे." असं म्हणत सध्याच्या या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली आहे.