Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:33 IST

एक हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.

मराठीतील अनेक कलाकार हे हिंदी मालिकेत झळकले आहेत. आता आणखी एक हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून सुचित्रा बांदेकर यांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं आहे. तर या मालिकेत 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळीही दिसणार आहेत. या हिंदी मालिकेचं नाव 'मनपसंद की शादी' असं असून मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. 

प्रोमोच्या सुरुवातीला मिलिंद गवळी आणि सुचित्रा बांदेकर दिसत आहेत. या मालिकेत ते ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारणार आहेत. प्रोमोमध्ये ते इंजिनियर लेक आरोहीच्या लग्नासाठी स्थळ शोधताना दिसत आहेत. मुलीसाठी मुलगा शोधायची जबाबदारी ही आईवडिलांची असल्याचं ते म्हणत आहेत. तर आरोहीला मात्र तिच्या पसंतीने मुलगा शोधायचा असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. 'मनपसंद की शादी' या मालिकेत दाखवलेलं हे कुटुंब मराठी आहे. 

'मनपसंद की शादी' मालिकेत ईशा सूर्यवंशी मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता अक्षुन महाजन मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. मिलिंद गवळी आणि सुचित्रा बांदेकर यांच्यासह मालिकेत स्वाती देवल आणि इरावती लागू यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. कलर्स टीव्हीवर येत्या ११ ऑगस्टपासून ही मालिका रात्री १० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :मिलिंद गवळीटिव्ही कलाकारकलर्स