सुबोध भावेने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकस्मात निधनानंतर त्याच्या भावुक भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय प्रियाचा पती शंतनू मोघेबद्दलही सांगितलं आहे. सुबोध म्हणतो, ''इतक्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपण कितीही म्हटलं की, काळ त्यातून बाहेर आणायला शक्ती देतो. तर तो काळ त्याला शक्ती देईल. खऱ्या अर्थाने ते दोघंच एकमेकांना होते. गेल्या १४ वर्षांचा काळ त्यांनी एकत्र व्यतीत केला होता.''
''त्या दोघांनी अनेक उपक्रम केले होते. एकत्र फिरले असतील, हॉटेल काढलं होतं, व्यवसाय सुरु केला होता. त्यामुळे ते असोसिएशन प्लॅटोनिक म्हणतो तसं होतं. शंतनू ज्यांना खूप मानायचा असे त्याचे वडील श्रीकांत मोघे यांच्यासोबत सुदैवाने मला काम करण्याची संधी मिळाली होती. ते सुद्धा अत्यंत जिंदादिल आणि विलक्षण प्रतिभेचे अभिनेते होते. त्यामुळे त्यांचंही जाणं त्याच्या आयुष्यातून झालंय. प्रियाचंही झालंय. शंतनू अत्यंत सेन्सिबल मुलगा आहे, हुशार आहे. मला खात्री आहे परमेश्वर त्याला या दुःखातून बाहेर येण्याची ताकद नक्कीच देईल.''
''तुटलाय का नाही? तर मला वाटतं कुठलाही माणूस आतमधून सावरायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही सर्वजण हीच प्रार्थना करतो की, जे त्याने सहन केलंय, जे त्याने प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय, जे त्याने भोगलंय त्याची आपण कल्पना करु शकत नाही. त्यामुळे आपण इतकीच प्रार्थना करु शकतो की, सगळ्या प्रकारचं बळ त्याला मिळो.''
''मानसिकरित्या यातून बाहेर येऊन स्वतःचं काम करण्याची ताकद त्याला मिळो. त्याला भरपूर काम मिळो जेणेकरुन जास्तीत जास्त काम करुन त्याला रिकामा वेळ राहणार नाही. मला भेटल्यानंतर प्रियाबद्दल चांगल्याच आठवणी तो सांगत होता. म्हणजे आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि आयुष्यभर असू. तो आणि प्रिया आमच्यासाठी वेगळे नाहीच आहेत. ते एकच आहेत.''