Join us  

Video: शिव ठाकरेने 'जय श्रीराम' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, फराह खानही झाली प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 2:43 PM

डान्स परफॉर्मन्समधून शिव ठाकरेनेही दाखवला श्रीरामाप्रती भक्तीभाव

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhla jaa 11) मध्ये मराठमोळा शिव ठाकरेही (Shiv Thakre)  स्पर्धक आहे. 'बिग बॉस' मराठी विजेता शिवने या शोमधून आपलं डान्सचं टॅलेंटही दाखवलं. स्पर्धक एकापेक्षा एक आपला परफॉर्मन्स देत आहेत. कालचा दिवस सर्व देशवासियांसाठी आणि रामभक्तांसाठी महत्वाचा होता. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत रामललाच्या मूर्तीची स्थापना झाली. शिवने आपल्या नृत्यातून रामाप्रती प्रेम व्यक्त केलं आहे. त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

२२ जानेवारी अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडला. रामललाचं अतिशय जल्लोषात स्वागत झालं. देशभरातील वातावरण राममय झालं होतं. दरम्यान 'झलक दिखला जा 11' मध्ये शिव ठाकरेने आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शिवने जय श्री रामाच्या गाण्यावर धमाकेदार नृत्य सादर केले. याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली. प्रोमोच्या सुरुवातीला परीक्षक अर्शद वारसी, मलायका अरोरा आणि फराह खान म्हणतात,'११ आठवडे, ११ सेलेब्स..आता होईल फिनालेपर्यंत तगडा झलक. यानंतर शिव ठाकरे आपल्या कोरियोग्राफरसोबत स्टेजवर येऊन आग लावतो. 'आदिपुरुष' मधील 'जय श्रीराम' गाण्यावर दमदार नृत्य सादर करत तो सर्वांना प्रभावित करतो. 

शिवच्या परफॉर्मन्सवर अर्शद वारसी म्हणतो,'तुझ्या परफॉर्मन्सने अंगावर शहारे आले.' तर फराह म्हणते 'एकदम मनाने आणि भक्तिभावाने तू हा परफॉर्मन्स सादर केला आहेस'. तीनही परीक्षक त्याला स्टँडिंह ओव्हेशनही देतात. 

शिव ठाकरे जवळपास सर्वच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. सर्वात आधी तो रोडीज मध्ये दिसला. यानंतर त्याने बिग बॉस मराठी 2 चे विजेतेपद पटकावले. यानंतर तो हिंदी बिग बॉस 16 मध्ये रनर अप होता. रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' मध्येही त्याने सहभाग घेतला. आता तो 'झलक दिखला जा' मधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :शीव ठाकरेटेलिव्हिजनराम मंदिरसोशल मीडियाफराह खान