Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री; निर्मिती क्षेत्रातही गाजवतीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 12:12 IST

Marathi actress: या अभिनेत्रीने सुरुवातीला 'अबोली' मालिकेत काम केलं त्यानंतर तिने ही मालिका सोडली. त्यानंतर आता पुन्हा तिची मालिकेत एन्ट्री होत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे मालिकांची लोकप्रियता पाहता रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. यात सुबोध भावे, स्पृहा जोशी, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, स्वप्नील जोशी यांसारख्या कलाकारांचं आवर्जुन नाव घेतं जातं. यामध्येच सध्या एका लोकप्रिय अभिनेत्री, निर्मातीची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या गाजलेल्या मालिकेत झळकणार आहे.

लोकप्रिय अभिनेत्री ते निर्माती असा यशस्वीपणे प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत (sharmishta raut). आजवरच्या कारकिर्दीत शर्मिष्ठाने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ती निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. त्यामुळे तिचा अभिनय क्षेत्रातील वावर तुलनेने कमी झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा ती एका लोकप्रिय मालिकेत एन्ट्री करत आहे. सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे अबोली. अभिनेता सचित पाटील आणि गौरी कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत शर्मिष्ठाने नीता सुर्वे ही भूमिका साकारली होती. मात्र, काही भागांमध्ये ती झळकली आणि तिने मालिकेतून काढता पाय घेतला. परंतु, पुन्हा एकदा त्याच भूमिकेत ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

शर्मिष्ठाने २०२२ मध्ये निर्मिती क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिने अबोली ही मालिका सोडली होती. ही मालिका सोडल्यानंतर तिने झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेची निर्मिती केली. तिची ही मालिका सुद्धा सध्या चांगलीच गाजतीये. अलिकडेच 'अबोली' या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये  शर्मिष्ठाची झलक दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, शर्मिष्ठाने 'अबोली' मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री मिनाक्षी राठोडची वर्णी लागली होती. परंतु, शर्मिष्ठाची पुन्हा एन्ट्री झाल्यामुळे तिने ही मालिका सोडली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेचा निरोप घेत असल्याचं सांगितलं.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी