Join us

श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:15 IST

निलेश साबळेने व्हिडीओत शरद उपाध्येंनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या एका पोस्टचाही उल्लेख केला होता. या पोस्टमध्ये शरद उपाध्ये यांनी अप्रत्यक्षपणे निलेश साबळेचा उल्लेख भंगारवाला म्हणून केला होता, असं निलेश साबळेचं म्हणणं होतं. आता या वादानंतर त्यांची ही पोस्टही व्हायरल होत आहे. 

'चला हवा येऊ द्या'मधूननिलेश साबळे बाहेर पडल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेल्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन निलेश साबळे करणार नाही तर अभिनेता अभिजीत खांडकेकर करताना दिसणार आहे. यावरुन निलेश साबळेला डच्चू दिल्याचं म्हणत शरद उपाध्ये यांनी पोस्ट लिहित 'चला हवा येऊ द्या'च्या शूटिंगचा अनुभव सांगत निलेश साबळेवर आरोप केले होते. त्यानंतर निलेश साबळेने एक व्हिडिओ शेअर शरद उपाध्येंना उत्तर दिलं होतं. 

या व्हिडिओत त्याने शरद उपाध्येंनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या एका पोस्टचाही उल्लेख केला होता. या पोस्टमध्ये शरद उपाध्ये यांनी अप्रत्यक्षपणे निलेश साबळेचा उल्लेख भंगारवाला म्हणून केला होता, असं निलेश साबळेचं म्हणणं होतं. आता या वादानंतर त्यांची ही पोस्टही व्हायरल होत आहे. 

शरद उपाध्ये यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं? 

भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे करोडो रुपये किंमतीचे कोहिनूर हिरे. पण त्यांची पारख अस्सल रत्नपारख्यालाच होईल ना. जेव्हा असे हिरे भंगारवाल्याच्या दृष्टीस पडतात तेव्हा त्याला ती काच वाटते आणि तो एखाद्या फुटाणेवाल्याला ती देऊन एक रुपयाचे फुटाणे विकत घेऊन खातो. 

 

खरा हिरा हा मौल्यवान पेटीत मखमलीच्या गादीवर ठेवायचा असतो. पण भंगारवाला त्याला घाणेरड्या कागदाच्या पुडीत पुरचुंडी करतो आणि कचऱ्याच्या भावात विकतो. रत्नांचा परिक्षक जव्हेरीच त्यांची अस्सल किंमत जाणतो. दुर्दैवाने हे मौल्यवान हिरे कधी साडीत, कधी लुंगीत, कधी अर्ध्या चड्डीत गुंडाळतात. फक्त फुटाणे मिळावेत म्हणून...

कधीतरी त्यांना आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत, चारित्र्यसंपन्न संतांच्या भूमिकेत, श्रेयाला एखाद्या तेजस्वी महाराणीच्या भूमिकेत सादर केले तर कसला कसदार अभिनय करतील ते हिरे! पण सतत वेडीवाकडी तोंडे, गलिच्छा मेकअप, अत्यंत हीन दर्जाचे पाचकळ विनोद, साड्या, आपल्याच वाहिनीवरच्या मालिकांचे विडंबन, आरडाओरडा, भाडोत्री प्रेक्षकांचे अशोभनीय अंगविक्षेप आणि हसणे, सुमार संदर्भहीन लेखन हे पाहून विषण्ण वाटते. किती प्रतिभावन कलावंत खालच्या दर्जाला नेले जातात! सुसंस्कृतपणापेक्षा टीआरपी महत्त्वाचा ठरतोय खरा...

दरम्यान, निलेश साबळेने शरद उपाध्येंना प्रत्युत्तर देत त्याची बाजू मांडल्यानंतर काही कलाकारांनी अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे. तर शरद उपाध्येंनी यावर पोस्टही केली आहे. 

टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार