Saatvya Mulichi Saatvi Mulgi: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अगदी अल्पवधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकेत तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde), ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. अलिकडेच मालिकाविश्वात 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु याबाबत या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टद्वारे तिने मालिका निरोप घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
नुकताच सोशल मीडियावर या मालिकेत नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तितीक्षाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये "निरोप हा अवघड असतो..." असं लिहिल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर #Netra #saatvya mulichi saatvi mulgi असे हॅशटॅग अभिनेत्रीने या व्हिडीओला दिले आहेत. त्यामुळे ही मालिका बंद होणार का असे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. शिवाय तितीक्षाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत.
१२ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने आता लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली होती. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपआपले पात्र उत्तमरित्या निभावलं. त्यामुळे प्रेक्षकांनाही ती पात्र आपलीशी वाटू लागली आहेत. पण अखेर २ वर्षानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी चर्चा देखील रंगू लागली आहे. दरम्यान, याबाबत झी मराठी वाहिनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.