Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिजीत सावंतला रितेश भाऊंनी दिली 'लय भारी' ट्रॉफी; म्हणाला, "लोक काहीही बोलू देत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:19 IST

"भले ट्रॉफी माझ्या हातात आली नसली तरी...", अभिजीत सावंतने शेअर केला व्हिडिओ

'इंडियन आयडॉल'चा पहिला विजेता मराठमोळा अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) नुकतंच 'बिग बॉस मराठी' मधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. अभिजीत कोणत्याही वादात अडकला नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून राहिला. म्हणूनच तो टॉप २ पर्यंत पोहोचू शकला. मात्र सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जास्त असल्याने अभिजीत रनर अप ठरला. अभिजीत ट्रॉफी जिंकू शकला नसला तरी त्याने सर्वांचं मन जिंकलं. रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) तर त्याला 'लय भारी' ट्रॉफी गिफ्ट दिली. याचा व्हिडिओ अभिजीतने नुकताच शेअर केला आहे.

अभिजीत सावंत ट्रॉफीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "भले ट्रॉफी माझ्या हातात आली नसेल तरी रितेश भाऊंनी ही ट्रॉफी ओळख म्हणून एक आठवण म्हणून मला दिली. हे देताना ते मला म्हणाले की एक असा व्यक्ती ज्याने खूप प्रामाणिकपणे आपला प्रवास पूर्ण केला. सुसंस्कृत पद्धतीने हा बिग बॉसचा खेळ खेळला. अगदी खरा व्यक्ती राहिला. ज्याने लोकांचेच नाही तर माझंही मन जिंकलं. म्हणून मला त्यांनी हे लय भारी अवॉर्ड दिलं. ही साधी ट्रॉफी असेल, साधी गोष्ट असेल तरी जे शब्द त्यांनी माझ्यासाठी संबोधले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एक माणूस म्हणून मी माझं अस्तित्व या घरात चांगल्या पद्धतीने टिकवू शकलो याचा मला अभिमान आहे. लोक कितीही काहीही बोलू देत मला माहितीये की खरी गोष्ट काय आहे. धन्यवाद."

यानंतर अभिजीतने 'वेड तुझा विरह वणवा' हे गाणंही गायलं. रितेशचे आभार मानत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "खूप खूप धन्यवाद रितेश भाऊ, तुम्हाला माझा गेम आवडला. मी तुमचं मन जिंकलं ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि ही लय भारी ट्रॉफी तुम्ही मला दिली त्यासाठी मनापासून आभार!

टॅग्स :अभिजीत सावंतरितेश देशमुखबिग बॉस मराठीसोशल मीडिया