Join us

"बारामतीची स्टाईल कोल्हापूरपर्यंत...", धनंजय पोवारला गुलाबी जॅकेटमध्ये पाहताच काय म्हणाला रितेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:08 IST

धनंजयला गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहताच होस्ट रितेश देशमुखने दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Bigg Boss Marathi 5 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून गुलाबी जॅकेटमुळे चर्चेत आहेत.  अजित पवारांचं 'पिंक पॉलिटिक्स' थेट 'बिग बॉस मराठी'च्या घरात पोहचल्याचं पाहायला मिळतंय. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडसाठी  कोल्हापुरी गडी आणि लोकप्रिय रील स्टार धनंजय पोवारने खास गुलाबी रंगाचा जॅकेट घातला होता. धनंजयला गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहताच होस्ट रितेश देशमुखने दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

'भाऊचा धक्का' एपिसोडमध्ये धनंजय पोवार  गुलाबी रंगाचा जॅकेटमध्ये पाहायला मिळाला. धनंजयला पाहताच रितेश म्हणाला, "धनंजय तुमचं जॅकेट फार छान आहे. टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण ही तिकडची स्टाइल आहे. कोल्हापूरपर्यंत आली आहे, असं कळतंय. छान दिसतंय". हे ऐकताच धनंजयसह घरातील इतर स्पर्धक हसू लागतात. 

 'लाडकी बहीण योजने'ची घोषणा केल्यापासून एरवी पांढऱ्या शुभ्र झब्बा पायजम्यात दिसणाऱ्या अजित पवार यांनी सदऱ्यावर अचानक गुलाबी जॅकेट चढवले आहे. अजित पवारांनीही जवळपास डझनभर गुलाबी रंगाची जॅकेट्स शिवून घेतल्याचं बोललं जातं आहे. 

कोण आहे धनंजय पोवार?

डीपी म्हणून प्रसिद्ध असलेला धनंजय पोवार आणि त्याचं कुटुंब आज राज्यातल्या घराघरांत पोहोचलंय. पोवार कुटुंबीयांनी तयार केलेले फनी व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच धुमाकूळ घालतात. हजरजबाबीपणा आणि त्यातून तयार होणारे विनोद यात डीपीचा हात धरणं अशक्यच आहे. धनंजय पोवारच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे 'धनंजय पोवार डीपी'.  धनंजय पोवारने 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एक साधा उद्योजक ते रील स्टार असा प्रवास करणारा धनंजय आता ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावरून चाहत्यांचं मनोरंजन करतोय.  धनंजय व कल्याणीला दोन गोड मुलं आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखअजित पवारसेलिब्रिटी