Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चाले'मधल्या माईची 'मन धागा धागा..'मध्ये एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार करारी भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:34 IST

Shakuntala nare:सध्या सोशल मीडियावर 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतील शकुंतला नरे यांच्या एन्ट्रीचा प्रोमो व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका संपून आता बराच काळ झाला आहे. मात्र, त्यातील कलाकार आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत येत असतात. यामध्येच मालिकेतील माई म्हणजेच अभिनेत्री शकुंतला नरे (Shakuntala nare) एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शांत, संयमी असलेल्या माईची भूमिका साकारणाऱ्या शकुंतला नरे लवकरच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत त्यांचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शकुंतला नरे या आनंदीच्या आजीची भूमिका साकारणार आहेत. इतकंच नाही तर त्या पहिल्यांदाच एका करारी भूमिकेत दिसणार आहे. या प्रोमोमध्ये त्यांचा दराराही दिसून येत आहे. त्यामुळे आता त्यांना मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. मराठी टीव्ही इन्फो या इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, रात्रीस खेळ चालेनंतर शकुंतला नरे सन मराठीवरील शाब्बास सुनबाई या मालिकेत झळकल्या होत्या. तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर ही जोडी मुख्य भूमिकेत झळकत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार