Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बडे अच्छे लगते है' मधील त्या सीनआधी साक्षीच्या वडिलांनी राम कपूरला केला होता कॉल, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:23 IST

"नंतर जे झालं ते सगळं एकता कपूरने...", राम कपूरने सांगितला तो किस्सा

राम कपूर (Ram Kapoor) आणि साक्षी तन्वर (Sakshi Tanwar) यांची 'बडे अच्छे लगते है' ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती. राम कपूर आणि प्रिया यांची  जोडी प्रेक्षकांच्या आवडीची होती. दरम्यान मालिकेतील एका एपिसोडमध्ये राम आणि प्रियामध्ये एक इंटिमेट सीन दाखवला होता. टीव्ही मालिकांमध्ये तोपर्यंत कधीच इतका इंटिमेट सीन दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे सीनची खूप चर्चा झाली तसंच राम आणि प्रिया ट्रोलही झाले. त्या सीनवरुन प्रियाच्या वडिलांनी रामला फोन केला होता असा खुलासा नुकताच त्याने केला आहे.

एकता कपूरची मालिका 'बडे अच्छे लगते है' मधील राम आणि प्रिया यांच्यातील इंटिमेट सीन १७ मिनिटांचा होता. या सीनवरुन चांगलाच हंगामा झाला होता. आता नुकतंच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत रामने त्या सीनवेळी नक्की काय काय झालं होतं याचा खुलासा केला. तो म्हणाला, "तो काळच असा होता ज्यामुळे हंगामा तर होणारच होता. मात्र साक्षी आणि माझ्यात सगळं ठीक होतं. आम्ही एकमेकांना कंफर्टेबल केलं. मला नाही तर एकताला सॉरी बोलायला लागलं होतं. मी अभिनेता आहे माझं काम अभिनय करणं होतं. स्क्रीप्टला फॉलो करणं होतं. स्क्रिप्टमध्ये तो सीन आहे जो मला करायचा आहे ज्यासाठी मला पैसे मिळाले आहेत. मग मी नकार देणार नाही कारण मी नखरे दाखवणारा कलाकार नाही."

तो पुढे म्हणाला, "एकताने तो सीन लिहिला. त्यावर मी तिला विचारलं की नक्की हे करायचंय ना. कारण आम्ही टीव्हीवरील पहिलेच असे कलाकार होतो जे असा सीन देणार होतो. ही मालिका लहान मुलं, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा सगळ्याच वयोगटातले प्रेक्षक बघत होते. करायचंच आहे अशी एकताला खात्री होती म्हणून मी आधी पत्नीची परवानगी घेतली. तिने होकार दिला नंतर मी साक्षीला विचारलं की तू नक्की तयार आहेस ना? नसशील तर एकताला मी समजावेल. पण तिलाही काहीच अडचण नव्हती. साक्षीच्या वडिलांनी मला फोन केला. ते म्हणाले, 'राम तू आहेस म्हणून मला विश्वास आहे'. मला ते ऐकून चांगलं वाटलं. साक्षीनेही माझ्यावर विश्वास दाखवला होता. दोन रात्रीत आम्ही तो सीन शूट केला. यानंतर जे झालं ते सगळं एकतानेच हँडल केलं."

टॅग्स :राम कपूरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार