मराठी कलाविश्वातून आज दु:खद बातमी समोर आली. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेने (Priya Marathe) जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. आज पहाटे तिचं निधन झालं. प्रियाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. तिच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांना तर विश्वास बसणंही कठीण जात आहे. त्यापैकीच एक सुबोध भावे (Subodh Bhave). गेल्या वर्षी सुबोध आणि प्रिया 'तू भेटशी नव्याने' मालिकेत दिसले होते. सुबोधने भावुक पोस्ट लिहित प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता सुबोध भावेने प्रियासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, "प्रिया मराठे, एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली.
काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. 'तू भेटशी नव्याने' या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली."
गेल्या वर्षी अभिनेते अतुल परचुरे यांचंही कॅन्सरनेच निधन झालं होतं. खरं तर त्यांनी कॅन्सरवर मात केली होती. मात्र नंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला होता. दुर्दैवाने प्रिया मराठेचीही कॅन्सरशीच झुंज अपयशी ठरली. आज प्रिया आपल्यात नाही यावर अनेकांना विश्वास बसत नाही.