'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. लग्नानंतर घरातली परिस्थिती कशी आहे यावर त्याने काल मिश्कील अंदाजात व्हिडिओ पोस्ट केला. काल विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. यालाच अनुसरुन त्याने मजेशीर रील केलं. बायको आणि आईची महायुती आघाडीवर तर वंचित नवरदेव पिछाडीवर असा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पृथ्वीकने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची बायको आणि आई सोफ्यावर आरामात बसून मोबाईल बघत असतात. यावर त्याने लिहिले, 'आमच्या घरामध्ये सासू-सून महायुती आघाडीवर'. नंतर तो स्वयंपाकघरात जातो आणि भांडी घासत असतो. यावर त्याने लिहिले,'आणि वंचित नवरा पिछाडीवर'. पृथ्वीकचं हे मिश्किल अंदाजातील रील सर्वांनाच आवडलंय. 'घरचं राजकारण कोणाला चुकलंय' असं कॅप्शन त्याने या व्हिडिओखाली दिले आहे.
घरात सासू सूनेची झालेली युती आणि नवरदेवाची अवस्था त्याने मजेशीर अंदाजात मांडली आहे. याला राजकीय तडका दिला आहे. कलाकार आणि चाहतेही त्याच्या रीलवर कमेंट करुन हसले आहेत. २५ ऑक्टोबरला पृथ्वीकने प्राजक्ता वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. अगदी साध्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला.