CID या लोकप्रिय मालिकेचा सीझन २ सध्या सुरु आहे. या सीझनलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत या तिकडीने पुन्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. मात्र काही दिवसांपूर्वी शोमध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आणि टीव्ही अभिनेता पार्थ समथानची एन्ट्री झाली. हा ट्वीस्ट मात्र प्रेक्षकांना रुचला नाही आणि सर्वांना पार्थला खूप ट्रोल केलं. मात्र आता पार्थची शोमधून एका महिन्यात एक्झिट झाली आहे. यावर त्याने प्रतिक्रियाही दिली आहे.
CID मध्ये शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची शोमधून सुट्टी झाली आहे. 'पिंकव्हिला'शी बोलताना पार्थ म्हणाला, "मी या शोमध्ये सुरुवातीला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतच आला होतो. मात्र नंतर माझी भूमिका काही महिने वाढवली गेली. सीआयडीसारख्या कल्ट शोचा भाग होणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. काही एपिसोड्ससाठीच मला घेण्यात आलं होतं. नंतर काही महिने भूमिका लांबवली गेली. हे आम्ही सुरुवातीलाच जाहीर केलं नाही कारण प्रेक्षकांचा उत्साह कमी झाला असता. आता शिवाजी सर परत आले असल्याने शोमध्ये सुरु असलेल्या केसचा खुलासा लवकरच होणार आहे."
तो पुढे म्हणाला, "माझे इतर काही वर्क कमिटमेंट्स आहेत त्यावर आता मला काम सुरु करायचं आहे. एसीपी आयुष्मानच्या भूमिकेत लोकांनी मला प्रेम दिलं त्यासाठी मी आभारी आहे."