Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझी तुझी रेशीमगाठ: यश-नेहाच्या लग्नसोहळ्यात तांत्रिक ‘विघ्न’, ‘झी मराठी’नं मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:52 IST

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील विवाह विशेष भागाबद्दल ‘झी मराठी’चं स्पष्टीकरण, प्रार्थनानेही मागितली माफी

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’  ( Mazhi Tuzhi Reshimgaath ) या मालिकेत सध्या लग्नाची धूम पाहायला मिळतेय. यश आणि नेहाचा लग्नसोहळा पाहण्यास चाहते उत्सुक होते. काल रविवारी 12 जूनला नेहा आणि यश लग्नबंधनात अडकले. हा एपिसोड कधी एकदा सुरू होतो, असं प्रेक्षकांना झालं होतं. हा एपिसोड सुरू झाला. पण या लग्नातही तांत्रिक बिघाडाचं ‘विघ्न’ आलं. यामुळे या विवाह विशेष भागामध्ये व्यत्यय आला.

जवळपास अर्धा तास प्रेक्षकांना चॅनलवर काय दिसलं तर नुसत्या जाहिराती. साहजिकच चाहत्यांचा हिरमोड झाला. अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. यानंतर या सगळ्या प्रकाराबद्दल झी मराठी वाहिनीला माफी मागावी लागली. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल जाहिर माफी मागत, स्पष्टीकरण दिलं आहे.

झी मराठीचं स्पष्टीकरण...‘काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या आजच्या विशेष भागात व्यत्यय आला.. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज 13 जून रोजी सकाळी 10 वा. आणि दुपारी 4 वा. पुन्हा एकदा दाखवणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरु नका. नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा फक्त झी मराठीवर..., असं निवेदन झी मराठीने दिलं आहे.  तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल आणि नेहा व यशचा विवाह सोहळा पाहण्यास उत्सुक असाल तर दुपारी 4 वाजता हा सोहळा पाहण्याची संधी तुमच्याकडे आहे.

प्रार्थना बेहरनं सुद्धा मागितली माफीमालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनं सुद्धा प्रेक्षकांची माफी मागितली आहे.  झी मराठीनं शेअर केलेल्या   निवेदनाचा एक फोटो प्रार्थनाने शेअर केला आहे. ‘माफी असावी, माफी असावी, माफी असावी, पुन्हा आमच्या मालिकेचा भाग पाहा आणि तुमच्या अविरत प्रेमासाठी धन्यवाद’, असं प्रार्थनाने म्हटलं आहे.’ 

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर, मायरा असे अनेक कलाकार आहेत. सध्या या मालिकेत नेहा आणि यशच्या नव्या नात्याला लवकरच सुरुवात होणार आहे.  अर्थात यादरम्यान एक नवा ट्विस्ट सुद्धा येणार  आहे. नेहा आणि यशच्या लग्नात तिच्या पहिल्या नव-याची एंट्री होणार  आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नात आणखी विघ्न येण्याची शक्यता आहे. मात्र या ट्विस्टमुळे या मालिकेचा टीआरपी आणखी वाढणार, हे मात्र नक्की आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारप्रार्थना बेहरेश्रेयस तळपदेझी मराठी