Join us

रायामुळे गुली मावशीचं सत्य येणार समोर; तुरुंगात होणार रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:38 IST

Mann jhal bajind: राया-कृष्णासमोर येणार गुली मावशीचं सत्य; संतापलेले भाऊसाहेब उचलणार महत्त्वाचं पाऊल

झी मराठीवरील 'मन झालं बाजिंद' या मालिकेला प्रेक्षकांनी अल्पावधीत उदंड प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत दररोज येणारी नवनवीन वळणं प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवत आहेत. त्यातच सध्या ही मालिका एका विलक्षण वळणावर आली आहे. कृष्णाचं अपहरण करणाऱ्या गुंडांना रायाने ओझरतंच पाहिलं आहे. त्यामुळे कृष्णाचं अपहरण करण्यामागे कोणाचा तरी हात असल्याचा त्याच्या मनातील संशय बळावतो. त्यामुळेच तो या गुंडांच्या मागावर जातो. विशेष म्हणजे यावेळी या सगळ्यामागे गुली मावशी असल्याचं सत्य त्याला कळणार आहे.

रायाने ज्या गुंडाला पाहिलं तो गुंड, गुली मावशी आणि अंतरासोबत मिळून काही तरी कटकारस्थान रचतोय असा संशय राया व कृष्णाला येतो. त्यामुळे ते दोघं या गुंडाच्या मागावर असतात. यामध्येच गुंडाच्या मागावर असताना राया एका अपघातातून थोडक्यात बचावतो. परंतु, मोठ्या प्रयत्नानंतर हा गुंड रायाच्या तावडीत सापडतो. 

गुंड सापडल्यानंतर राया त्याला चांगलाच चोप देतो आणि या सगळ्या प्रकारामागे असलेल्या व्यक्तीचं नाव विचारतो. त्यावेळी हा व्यक्ती गुली मावशीचं नाव सांगतो. इतकंच नाही तर हा सगळ्या प्रकार विधाते कुटुंबासमोर उघड व्हावा यासाठी राया त्याला घेऊन विधातेंच्या बंगल्यावर घेऊन जातो आणि त्याच्याकडून सत्य सगळ्यांसमोर वदवून घेतो.

दरम्यान, हा गुंड, सगळ्या कटामागे गुली मावशी असल्याचं सांगतो. त्यामुळे संतापलेले भाऊसाहेब पोलिसांना बोलावतात आणि गुली मावशीला तुरुंगात टाकण्यास सांगतात. आता गुली मावशीला तिच्या वाईट कृत्यांची शिक्षा मिळणार का? तिला तुरुंगवासाची शिक्षा होणार का? तिच्यासोबत अंतराला पण शिक्षा होणार का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार