Gaurav More Reaction On Trolling: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या चर्चेत आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा अभिनेता नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. फिल्टरपाड्याच्या बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने मराठीसह अनेक हिंदी रिअॅलिटी शोदेखील गाजवले आहेत. आता गौरव चला हवा येऊ च्या नव्याकोऱ्या पर्वात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याचनिमित्ताने गौरव मोरेने दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
नुकतीच गौरव मोरेने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गौरवने ट्रोल करणाऱ्या चांगलच सुनावलं. याबद्दल बोलताना गौरव म्हणाला, "त्या ट्रोलर्सना मी फिल्टरपाड्यात घेऊन जाईन आणि म्हणेन आता ट्रोल कर. तुझ्यात किती डेरिंग आहे ते आम्हाला दाखव. याआधी मी बऱ्याच जणांना बोललोय की, मी 'तुम्ही राहताय तिकडे येतो, तुम्ही फक्त एकदा आमच्या फिल्टरपाड्यात यायचं आणि तिथून घरी जायचं'. आम्हाला सगळं माहितीये, आमचा जन्म तिथं गेलाय त्यामुळे आम्ही सगळे बघितलंय. हे ट्रोलर वगैरे आता आले आहेत. आम्ही मोठे-मोठे भाई बघितले आहेत."
त्यानंतर पुढे गौरव मोरे म्हणाला, "माझं म्हणणं एवढंच आहे की, मी बऱ्याचदा याबद्दल बोललो आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाहीतर मग स्क्रोल करा, त्यावर कमेंट करायची काय गरज आहे? बरं, त्या कमेंट्सही खूप घाणेरड्या असतात. या गोष्टीचा मला फार राग येतो. एखाद्या मुलीने किंवा हिरोईनने सोशल मीडियावर फोटो टाकला तर त्यावर कमेंट केल्या जातात. तुम्हाला हेच का दाखवायचं आहे की अशीच मला कमेंट करायची आहे. तुम्हाला जर त्या गोष्टी नाही आवडल्या तर पुढे जा. त्यावर कमेंट करु नका. "
घाणेरड्या कमेंट्स करणं चुकीचं...
मग पुढे गौरव म्हणाला, "तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही चिडताय की कोणता राग आहे हेच मला कळत नाही. प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी काय करावं, काय करु नये हे तुम्ही ठरवू नका. म्हणून घाणेरडी कमेंट करणं गरजेचं आहे का चांगली मतंही मांडता येतात. मला खासकरुन मुलींच्याबाबतीत जास्त वाईट वाटतं. कारण, मी त्या कमेंट्स वाचल्या आहेत. हे लोक फक्त समोरासमोर आले पाहिजेत. मग बघता येईल." असं म्हणत गौरव मोरेने ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत.