Madhuri Pawar: कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांचं नातं काही वेगळंच असतं. कलाकारांचा अभिनय त्यांनी साकारलेली पात्रं चाहत्यांना कायम प्रभावित करत असतात. इतकंच नाही तर हे चाहते कोणत्याही माध्यमातून त्यांच्या आवडत्या कलाकारांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. असाच काहीसा अनुभव येड लागलं प्रेमाचं फेम अभिनेत्री माधुरी पवारला आला आहे. याबाबत सोशल माडियावर अभिनेत्रीने सुंदर असा व्हिडीओ पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'येड लागलं प्रेमाचं' फेम माधुरी पवारने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये माधुरी तिच्या एका चाहतीकडे व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसते आहे. त्या व्हिडीओमधील काकू अभिनेत्रीची प्रेमाने विचारपूस करतात. शिवाय माधुरीचं तोंडभरुन कौतुक करतात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत माधुरीने कॅप्शन देत लिहिलंय की, "कलाकार म्हणून स्टेजवर, स्क्रीनवर तुमच्यासमोर उभं राहणं हे आमचं काम आहे... पण तुमचं प्रेम, तुमचं कौतुक, आणि तुमचा आवाज ऐकणं हा अनुभव त्या सगळ्यांपेक्षा खास असतो.कारण एक कलाकार म्हणून आमचं खरं यश हे अवॉर्डमध्ये नाही, तर अशा तुमच्या बोलण्यात, तुमच्या भावनांमध्ये असतं. हा फॅन कॉल म्हणजे तुमच्याशी असलेलं नातं आणखी घट्ट होण्याची एक संधी आहे. धन्यवाद, की तुम्ही आम्हाला इतकं प्रेम देता तुमच्या शब्दांमुळे आमच्या कलेला खरा अर्थ मिळतो....", या व्हिडीओमध्ये माधुरी आणि व्हिडीओमधील काकू दोघीही आनंदित असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
वर्कफ्रंट
'तुझ्यात जीव रंगला', ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, 'अल्याड पल्याड', 'लंडन मिसळ' या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरात पोहोचली. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. माधुरीने सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या माधुरी पवार स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत काम करताना दिसत आहे.