Madhavi Nimkar: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे माधवी निमकर (Madhavi Nimkar). अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये तिने साकारलेलं शालिनी नावाचं पात्र प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलं. माधवी निमकर अनेकदा चर्चेत येत असते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही शेअर करत असते. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील काही कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे.
माधवी निमकरने सुमन म्युझिक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर मत मांडलं. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "खरं सांगू का मी त्या कमेंट्सकडे लक्षच देत नाही. पूर्वी कोणी माझ्यावर कमेंट केली किंवा कोणी काही वाईट बोललं तर या सगळ्याने फरक पडायचा. पण, आता मला फरक पडत नाही. मी एक ठरवलं होतं की मला चुकीच्या गोष्टींचा काहीच फरक पडू नये. जिथे फरक पडला पाहिजे तिथे पडला पाहिजे. ट्रोलिंग जे होतं त्यातून मी त्यातून सकारात्मक विचार करते की, सोशल आहे मीडिया आहे त्यावर लोकं त्यांची मतं व्यक्त करतात. पण काही लोकांचं ट्रोलिंग असतं ते विचार करायला लावणारं असतं. बऱ्याचदा काही जणांकडून चांगले सल्ले दिले जातात. कधी कधी ट्रोलिंग हे सेन्सिबल असतं. मग त्यामुळे मला राग येत नाही."
पुढे अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला की, आपल्याकडे फिटनेसला वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, एखादी बाई फिटनेससाठी जिमला जाते तेव्हा तिच्यावर बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. त्यावर उत्तर देताना माधवी म्हणाली, "ज्यावेळी स्त्री स्वत: कडे लक्ष द्यायला लागते. मी छान दिसले पाहिजे. माझी शरीरयष्टी छान राहिली पाहिजे. तर तिथे त्या बाईला स्वार्थी म्हटलं जातं किंवा त्या बाईला घरातलं काहीच पडलं नाही. फक्त स्वत: कडे लक्ष देते तिला जजमेंटल असं म्हटलं जातं. तुम्ही कसेही वागलात किंवा कितीही चांगल्या वागलात. तरीही बोललं जातं. आपण स्वत: साठी वेळ काढला तर बऱ्याच ठिकाणी आजही मुलींना जज केलं जातं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.