Join us

"देवानं आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर...",'शिवा' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली- "बाप म्हणून कधी..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:01 IST

'शिवा' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली...

Mansi Mhatre Post: काही मालिकांची लोकप्रियता इतकी असते की या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात. त्यातील एक मालिका म्हणजे शिवा. झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनत्री पूर्वा कौशिकने शिवाची भूमिका साकारली आहे. तर शाल्व किंजवडेकर आशुच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. सततच्या नवीन ट्विस्टमुळे मालिकेत पुढे काय होणार याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांची उत्सुकता लागून राहिलेली असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर 'शिवा' मालिकेत कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी म्हात्रेने चर्चेत आली आहे. 

मानसीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये लिहिलंय की, "थोडं अजून थांबायचं ना पप्पा ... एवढी घाई कसली होती? बघता बघता 4 वर्ष झाली तुम्ही जाऊन , कसे दिवस जातायत कळत सुद्धा नाहीये. आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर आपल्याला वेगळं केलं देवानं , तुमच्याकडून खूप गोष्टी शिकायच्या राहून गेल्यात पण तुम्ही असेपर्यंत जे जे शिकवलंय ते ते आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर उपयोगी पडतंय. आज खूप जवळची , लांबची माणसं माझं भरभरून कौतुक करतात पण तुमच्या तोंडून जिंकलस पोरी , लय भारी , माझी लेक अशा कित्येक कौतुकाने भरलेल्या शब्दांची कमी कायम भासतेय. बाप म्हणून कधी कुठेच कमी पडला नाहीत आणि माणूस म्हणून कायम लोकांची मदत केलीत , तुमच्या एवढं Perfect जगता ,वागता येईल की नाही माहित नाही पण तुम्ही नेहमी सांगता तसं .... (प्रयत्न चालू ठेव मानसी प्रयत्नांना आणि कष्टाला नक्की फळ मिळतं.) प्रयत्न करत राहीन."

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "तुम्हाला जाऊन कितीही वर्ष होउदे पप्पा तुम्ही माझे देव आहात आणि देव या जगाच्या कानाकोपऱ्यात आहे आणि राहील. आणि जो पर्यंत तुम्ही आहात तो पर्यंत माझं काहीही वाईट होणार नाही. तुमची बरीच स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि करेनच . तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, काळजी घ्या .... आम्ही खूप प्रेम करतो तुमच्यावर... बाबा तुम्हाला मी मिस करते तुम्ही कायम माझ्या हृदयात राहाल." असं लिहून अभिनेत्रीने तिच्या मनातील भावनांना मोकळीक करुन दिली आहे.

वर्कफ्रंट

दरम्यान, अभिनेत्री मानसी म्हात्रेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'स्वाभिमान-शोध अस्तिवाचा', 'स्वराज्य जननी जिजामाता' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री 'शिवा' या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया