Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या कामासह सोशल मीडिया पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत येतात. आजवर त्यांनी वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अलिकडेच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. दिनकरराव माने असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे माने कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. अशातच वडिलांच्या आठवणीत किरण माने यांनी भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी. खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला… नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो... पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला. गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीनचार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो."
यानंतर त्यांनी लिहिलंय, "दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, “दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच.” काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की ‘शेजारी बस.’ मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले... माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला."
वडिलांनी दिला होता मोलाचा सल्ला...
याबद्दल सांगताना त्यांनी लिहिलं, "ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले. दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर ! दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते… ते म्हणाले, “तुझ्या वडीलांकडे सुखी माणसाचा सदरा होता !”तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा. आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे. जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ।।- किरण माने..." अशी पोस्ट शेअर करत अभिनेते वडिलांच्या आठवणीत भावुक झाले आहेत.