Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. पण आता...'; प्रेग्नंसीवर कार्तिकीची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:16 IST

Kartiki gaikwad: कार्तिकीने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं आहे. यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

झी मराठीवरील लिटील चॅम्प फेम कार्तिकी गायकवाड (kartiki gaikwad) लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे सध्या ती तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहे. कार्तिकीने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केल्यानंतर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यामध्येच आता कार्तिकीने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीवर भाष्य केलं आहे.

कार्तिकीचं डोहाळजेवण मोठ्या थाटात पार पडलं. या डोहाळ जेवणाचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्येच समर्था खेसे या युट्यूब चॅनेलवर कार्तिकीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात तिने तिच्या प्रेग्नंसीच्या प्रवासाविषयी भाष्य केलं आहे.

"आज माझा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे आणि आज खूपच वेगळ्या भावना आहेत. कारण, आतापर्यंत आयुष्यात अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. एक लहान कार्तिकी महाराष्ट्रातील, जगभरातील रसिक प्रेक्षकांसमोर आली. आपण उदंड आशीर्वाद, प्रेम दिलं. त्यानंतर कधीच अशी कल्पनाही केली नव्हती. लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नव्हता. पण २०२० मध्ये माझं रोनित पिसे यांच्याशी लग्न झालं आणि त्यानंतर आता एका नव्या वेगळ्या भूमिकेत म्हणजे आईच्या भूमिकेत जातेय. ही खूप वेगळी भावना आहे. एक जबाबदारी वाटतेय. त्याचबरोबर आनंदीही खूप सारा आहे”, असं कार्तिकी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “असं म्हणतात की, आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. तर अगदी खरं तसंच होणार आहे मला वाटतंय. जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा आईच महत्त्व अधिक कळतं. त्यामुळे ही एक वेगळी भूमिका असणार आहे. आणि मी माऊली चरणी, देवा चरणी हीच प्रार्थना करेन की, बाळाला त्यांनी खूप सुखी, समाधानी आयुष्य द्यावं आणि बाळाचं आरोग्य उत्तम राहो. बाळाच्या येण्याने आमच्या परिवारात प्रचंड आनंद झालेला आहे. बाळ आल्यानंतर तो आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद असेच आमच्या परिवाराच्या पाठीशी राहू द्या. आता नवीन सदस्य आमच्या परिवारात येतोय तर त्याच्यावर किंवा तिच्यावर सुद्धा राहू द्या”.

दरम्यान, कार्तिकीने २०२० मध्ये रोनित पिसे याच्याशी लग्न केलं. त्यानंतर आता त्यांच्या संसारवेलीवर फूल उमलणार आहे. त्यामुळे सध्या कार्तिकी आणि रोनित दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी