मराठीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) वयाच्या ५७ व्या वर्षी देखील एकदम फिट आणि सुंदर दिसतात. नुकत्याच त्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांच्या फिटनेसची झलक आपण पाहिली. ९० च्या दशकात त्यांनी आपल्या सिनेमांमधून प्रेक्षकांना प्रेमात पाडलं होतं. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांच्यासोबतचे त्यांचे सिनेमे गाजले. शिवाय त्यांनी हिंदीतही मिथून चक्रवर्ती, ऋषी कपूर, अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली. नुकतंच वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.
'फिल्मसिटी'ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी त्यांचं डाएट कसं असतं, किती आणि काय खावं याविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, "ही देवाची देणगी आहे. तसंच फिटनेसबाबतीत मी माझ्या वडिलांवरच गेले आहे. मी आजपर्यंत जाड झाले नाही. मला जरा जरी ताप आला तरी मी बारीक होते. मी फूडीही आहे पण मला घरचं पारंपरिक जेवण आवडतं. मासे, भात, पुरणपोळी खायला आवडतं. पण मी बेतानेच खाते. त्यात बुडून जात नाही. तुम्ही खाण्यासाठी जगता त्याला काही अर्थ नाही. तो उपभोग तेवढाच घ्यायचा."
त्या पुढे म्हणाल्या, "मी मासे भरपूर खाते. त्याने काही चरबी वाढत नाही. प्रोटीन मिळतं. भात बेताचाच खाते. आपलं पोट फुग्यासारखं असतं. जितकं वाढवू तितकं फुगत जातं. त्यामुळे नियंत्रणात खा. पोट भरुन खाऊ नका पोटात थोडी जागा ठेवा. वय वाढत जातं तसं खाणं कमी झालं पाहिजे. या गोष्टी मी पाळते. मी आईस्क्रीम खात नाही. मला आवडतं पण तरी मी त्याचा त्याग केला आहे."