Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत बांधली आयुष्यभराची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 12:52 IST

अभिनेत्री सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत आहे.

छोट्या पडद्यावरील सध्याची लोकप्रिय मराठी मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या जवळचे झाले आहेत. अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी अशी सर्वच पात्र गाजत आहेत. झी मराठीवरील या मालिकेने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. दरम्यान मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय याची उत्सुकता प्रेक्षकांना असतेच. मालिकेतील एक अभिनेत्री नुकतीच खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षराच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋता काळेने (Ruta Kale) लग्न केले आहे. बॉयफ्रेंड अभिषेक लोकनरसोबत (Abhishek Loknar) तिचा विवाहसोहळा पार पडला. अभिषेक स्वत: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आहे. ऋताने लग्नात नऊवारी साडी नेसली होती ज्यात तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. हिरव्या रंगाची नऊवारी, जांभळ्या रंगाचं उपरणं,  मुंडावळ्या, साजेते दागिने, नथ अशा पारंपरिक पेहरावाला तिने पसंती दिली. तर अभिषेकही पांढरा कुर्ता, धोती आणि जॅकेटमध्ये होता. तर त्याने खांद्यावर हिरव्या रंगाचं उपरणं घेतलं. दोघंही लक्ष्मी नाराणयाचा जोडा असल्यासारखे शोभून दिसत होते. ऋताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऋताच्या लग्नात मालिकेतील कोणताही कलाकार आलेला दिसला नाही. अभिनेत्री अनुजा साठे पती सौरभ गोखलेसह आवर्जुन आली होती. त्यांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसंच चाहत्यांनीही ऋताला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋता आणि अभिषेक यांचा ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अभिषेकने 'पंधरवडा','अनवट' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याला 'पंधरवडा'साठी गोवा फिल्म फेस्टिव्हल येथे पुरस्कारही मिळाला आहे. 'अनवट' मध्येच ऋतानेही काम केलं होतं. तेव्हाच दोघं एकमेकांना भेटले. नंतर प्रेमात पडले. अभिषेकने ऋताला गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. आज त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतालग्नशिवानी रांगोळेकविता लाडटिव्ही कलाकार