आजकालची पिढी सोशल मीडिया आणि इन्स्टाग्राम रील्सच्या आहारी गेली आहे. यावर नुकतंच मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशीने प्रतिक्रिया दिली आहे. नेहाने 'झेंडा', 'पोस्टर बॉईज' सारख्या सिनेमांमध्ये नेहाने काम केलं आहे. 'दृश्यम २' मध्येही तिने भूमिका साकारली. तर सध्या 'अटल' या हिंदी मालिकेत ती भूमिका साकारत आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने तरुण पिढी आणि सोशल मीडियावर भाष्य केलं.
नेहा म्हणाली,"मला वाटतं आजची पिढी जास्त पुढे पळत आहे. तरुणांमध्ये स्थैर्य (stability) राहिलेलं नाही. सोशल मीडिया, इन्स्टाग्राम रील्समुळे त्यांच्यात खोट्या आशा निर्माण झाल्या आहेत. मेहनत, जिद्द आता मागे पडली आहे. जर तुम्ही कलाकार असाल तर तुम्हाला तुमचं टॅलेंट सिद्ध करावं लागेल. जसं कित्येक कलाकार मग ते म्युझिक इंडस्ट्रीतील असो किंवा अभिनेते असो किंवा थिएटर आर्टिस्ट त्यांचा अनेक वर्षांचा अभ्यास, तपस्या आणि रियाज असतो."
ती पुढे म्हणाली, "आपण आपल्या मुळाशी कायम जोडलेलं असावं. तेव्हाच तर आपण स्वत:ला भारतीय म्हणू. तपस्या, रियाज आणि स्थैर्य हे आपले खरे गुण आहेत. लहान मुलांना शिकवण्याआधी आपल्याला स्वत:ला योग्य पद्धतीने राहावं लागेल. आपण लहान मुलांचा आदर्श आहोत, कारण ते जे पाहतात तेच शिकतात. आमची अटल मालिका आणि अशा अनेक मालिका याचीच शिकवण देतात. असे प्रोजेक्ट्स आपल्याला इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडवतात."