Join us

"कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे थकत होती, तरीही...", प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री हळहळली, सांगितली भावुक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:09 IST

प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री हळहळली, सांगितली भावुक आठवण

Priya Marathe Passed Away: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. तिच्या जाण्याने  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने एक उज्ज्वल, बहुगुणी आणि गुणी कलाकार गमावला आहे.कर्करोगाशी धैर्याने झुंज देत केवळ ३८व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. पवित्र रिश्ता मधील वर्षा असो किंवा 'तुझेच मी गीत गात आहे'मधील मोनिका कामत तसेच मराठी मालिकांमधील प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.प्रिया मराठेच्या निधनाने मराठी कलाकारांनाही धक्का बसला आहे. अशातच मराठी अभिनेत्री,लेखिका मुग्धा गोडबोलेने  प्रिया मराठेच्या निधनाची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री मुग्धा गोडबोलने तिच्या अधिकृत फेसबूक अकाउंटवर प्रिया मराठेच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्यामुळे प्रियाला ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागला होता. याबद्दलही तिने सांगितलं आहे.दरम्यान, या पोस्टमध्ये तिने लिहिलंय,"जुलै 2023 मध्ये प्रियाने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला होता. 'प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे.' चॅनेलनेही आपल्या official page वरून तो व्हिडिओ शेअर केला. प्रियाला कॅन्सर झाला होता. तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती. त्याचा परिणाम म्हणून असेल, पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या. इथे उच्चारता येणार नाहीत अश्या. काय वाटलं असेल तिला? 

त्यानंतर अभिनेत्रीने पुढे म्हटलंय, "प्रिया गेली. दोन वर्ष झगडून थकली.त्याबद्दल अतोनात दुःख आहे.फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते.एरवी तशी मी  टगी आहे. पण प्रिया फार गोड मुलगी होती.फार सज्जन.राहून राहून पुन्हा तोच प्रश्न.का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट? कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्याइतके? स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता. एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात. विष पसरत जातं. असो! प्रिया, फार फार दुर्दैवी घटना. अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने भावुक आठवण शेअर केली आहे. 

टॅग्स :प्रिया मराठेटिव्ही कलाकारमृत्यू