Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संमेलनाचा पत्ताच सापडला नाही? वंदना गुप्ते मुंबईत परतल्या; म्हणाल्या, 'नटून थटून आले पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:36 IST

पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचा पत्ताच सापडला नाही म्हणून वंदना गुप्तेंनी व्यक्त केली नाराजी

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन यंदा पिंपरी चिंचवड येथे करण्यात आले होते. नाट्य संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री उदय सामंत यांची हजेरी होती. तर पहिल्यांदाच नाट्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असलेले कलाकार प्रशांत दामले यांनी संमेलनाला संबोधित केलं. अनेक मराठी कलाकारांनी या नाट्य संमेलनाला आणि सकाळी पार पडलेल्या नाट्य दिंडीला हजेरी लावली. मात्र ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) काही या संमेलनाला पोहोचू शकल्या नाहीत. नाट्य संमेलनाचा पत्ताच न सापडल्याची तक्रार त्यांनी व्हिडिओ शेअर करत केली.

अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी काल त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्या म्हणाल्या,'मी परत मुंबईला चालले आहे. मी नुसतीच गोलगोल फिरतीये, मला एकही कुठलंही सभामंडप दिसलं नाही सापडलं नाही. आता रामकृष्ण मोरे सभागृह माहितीये म्हणून पण मला काही आता इकडे तिकडे जायचं नाही. मी आले होते नटून थटून पण मला काही कार्यक्रमाला वेळेत पोहोचता आलं नाही म्हणून मी आता परत निघाले आहे.' नंतर हा व्हिडिओ त्यांनी डिलीट केला आहे.

वंदना गुप्ते यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्यांचीच मजा घेतली. 'सगळेच मराठी कलाकार हजर होते मग यांनाच कसा पत्ता सापडला नाही','मॅडम रामकृष्ण मोरे सभागृहापासून हाकेच्या अंतरावर मोरया गोसावी ग्राऊंडमध्ये होतं संमेलन, योग्य मान मिळाला नसावा म्हणून नाट्य परिषदेवर खापर फोडत असावे' अशा कमेंट्स त्यांच्या व्हिडिओवर आल्या आहेत. 'शिक्षित लोक अशिक्षितासारखे का वागतात, गुगल मॅप लावायचा होता' अशीही कमेंट एकाने केली आहे. 

टॅग्स :वंदना गुप्तेमराठी अभिनेतामराठी नाट्य संमेलनपुणे