Join us

"वेगळं होण्यामध्ये दोन कुटुंब उद्धवस्त होतात...", घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर ऐश्वर्या नारकर यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 11:20 IST

"कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय...", ऐश्वर्या नारकर यांनी वाढत्या घटस्फोटांबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाल्या...

Aishwarya Narkar: मराठी कलाविश्वातील सदाबहार जोडी म्हणून ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि  अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. गेली अनेक वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा चाहत्यांच्या मनावर उमटवला आहे. ३ डिसेंबर १९९५ साली ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या सुखी संसाराला जवळपास तीस वर्ष झाली आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य केलं आहे. 

नुकतीच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "आता खूप सोपं झालंय असं असू शकत कदाचित कारण पूर्वी म्हणजे आमच्या आधीची पिढी काय किंवा आमची पिढी काय, त्यावेळी घटस्फोट हा पर्यायच नव्हता. किंवा घटस्फोट हा अगदीच क्वचित कोणाच्यातरी आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत म्हणून झालेत असं होतं. पण, आजकाल अगदी सहज हा पर्याय अनेकांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे नाही पटलं तर लगेच घटस्फोट किंवा बेसिक गोष्टी नाही पटल्या तर त्यावर एकमत करण्यापेक्षा एका निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्नच करत नाही. फक्त पटत नाही म्हणून आपण एकत्र राहायला नको,असा निर्णय घेतला जातो आणि घटस्फोट होतात."

त्यानंतर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "हा पर्याय डोळ्यासमोर धरुनच काही वेळेला लिव्हइन ते नंतर लग्न असं केलं जातं. लग्न करुन मग नाही पटलं तर बाजूला होऊ असं पण ती कमिटमेंट ती कुटुंबव्यवस्था त्या कुटुंबव्यवस्थेवरचा विश्वास कुठेतरी कमी होतोय, ते जपलं गेलं पाहिजे. त्यामुळे आताची पिढीमध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. एकमेकांना पटत नाही म्हणून ते वेगळं राहतात. पण, ते वेगळं होण्यामध्ये दोन कुटुंब उद्धवस्त होतात किंवा त्यांची वाट लागते हा विचारच केला जात नाही. शिवाय आजकाल प्रत्येकजण स्वतंत्र आहे, प्रत्येकजण स्वत: च्या पायावर उभं असल्यामुळे एकमेकांचा आधार घेऊनच पुढे जायचं हा पर्यायच नाही. मी स्वत: पुढे जाईन, मला कोणाची गरज नाही, असं असतं. जसं प्रेमात ब्रेकअप होतं तसे हल्ली घटस्फोट होतात." असं म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकारघटस्फोट