Join us

अभिज्ञा भावेचा नवरा लढतोय कॅन्सरशी लढाई, रूग्णालयातील फोटो पाहून सगळेच हळवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 15:57 IST

Abhidnya Bhave : मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’, असं लिहित मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे.

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. गतवर्षी अभिज्ञाने मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. पण सध्या मेहुल हा कॅन्सरशी झुंज देत आहे. मेहुलने नुकतीच याबाबतची पोस्ट शेअर केली आणि ती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. पोस्ट सोबत त्याने रूग्णालयातील फोटोही शेअर केलेत. हे फोटो पाहून सगळेच हळवे झाले आहेत.

मेहुलने शेअर केलेल्या फोटोत अभिज्ञाही दिसतेय. या फोटोत अभिज्ञा आणि मेहुल एका रूग्णालयात दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत अभिज्ञा ही मेहुलच्या डोक्याचं चुंबन घेताना दिसतेय. या फोटोंना मेहुलने अतिशय भावुक करणारं कॅप्शन दिलं आहे.

‘मला माझ्या आयुष्यात अनेक मूर्ख लोक भेटलेत. पण कॅन्सर हा त्यापैकी सर्वात मोठा मूर्ख... माफ कर कॅन्सर, पण तू चुकीच्या व्यक्तिला निवडलं आहेस...,’ असं मेहूलने लिहिलं आहे.

मेहुलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत, तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. अभिज्ञाची अतिशय जवळची मैत्रिण व अभिनेत्री मयुरी देशमुख हिने त्याच्या या पोस्टवर कमेंट करत, त्याला धीर दिला आहे. ‘तू रॉकस्टार आहेस, तुझ्यासोबत असलेल्या व्यक्तिमुळे विजय तुझाच होणार आहे,’ असं मयुरीने लिहिलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान 6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा व मेहुल दोघंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी मेहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तो बरा देखील झाला होता. पण आता त्याला कॅन्सरनं गाठलं आहे.अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते.  मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. अचानक हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.  अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती.  अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12 वर्षांपासून  क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. आता अभिज्ञा झी मराठीवरली ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसणार आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकर्करोग