Join us

"भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शून गेलं...", अभिज्ञा भावेच्या पतीने सांगितला स्वामींच्या दर्शनाचा अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:23 IST

स्वामींच्या भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभव अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या पती मेहुल पै याने शेअर केला आहे.

Abhidnya Bhave husband Mehul Pai Post: दत्तगुरुंच्या अवतारांपैकी एक आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचा मानणारा लाखोंचा समुदाय आहे. लाखो अनुयायी आहेत. प्रत्येकाला स्वामी आपल्या सोबत कायम आहेच ही प्रचिती येत असते. अनेक मराठी कलाकारमंडळी देखील स्वामींचे भक्त आहेत. अशातच स्वामींच्या दर्शनाचा एक अविस्मरणीय अनुभव अभिनेत्री अभिज्ञा भावेचा (Abhidnya Bhave) पती मेहुल पै याने शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या पतीने इनस्टाग्रामवर खास पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वामींच्या दर्शनाचा अनोखा अनुभव सांगितला आहे. मेहुलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय की,"मी मठात गेलो होतो आणि पायऱ्या चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले. त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली. त्यांच्या हालचालींत एक अशक्तपणा जाणवत होता आणि तेव्हा जाणवलं की, कदाचित त्यांना Parkinson चा त्रास असावा. ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले, मी आधी स्वामींच्या पाया पडतो. मग तू पाया पड.” त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शून गेलं. मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले."

पुढे त्याने लिहिलंय की,"दर्शनानंतर ते उपासनेला बसले. शांत गूढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं, थोडा वेळ थांबसील का मी उपसना करेपर्यंत ... मी थांबलो आणि त्या क्षणात एक न सांगता येणारा आत्मिक संवाद झाला. उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांनी खूप आपुलकीने विचारलं,"घरी कोण आहे रे तुझ्या?" मी प्रेमाने सांगितल्यावर ते म्हणाले, येत्या २४ एप्रिलला बायकोला पुरणपोळी करायला सांग... आणि मग परत मठात ये. इथेच स्वामीपुढे ती ठेव आणि बघ लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील." थोड्या वेळाने ते हसत म्हणाले, तु कुठे चाललायस? आणि शेवटी हळुवारपणे विचारलं- थोडं पुढे रस्ता क्रॉस करुन देशील का? असं झालं आज स्वामींचं दर्शन..."

स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण...

"एक साधा वाटणारा प्रसंग... पण मनाच्या आत खोलवर स्पर्श करुन गेला. कधी कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी, रक्ताच्या नात्यापेक्षा खरी वाटते... स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण, मनात आयुष्यभरासाठी घर करुन जातात.आणि त्यांची कृपा कोणत्या रुपात भेटेल, हे कधीच सांगता येत नाही." अशा आशयाची पोस्ट मेहुलने शेअर केली आहे. 

टॅग्स :अभिज्ञा भावेटिव्ही कलाकारसोशल मीडिया