Kaumudi Walokar Husband Akash Post: स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अगदी काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी अजूनही या मालिकेची क्रेझ काही कमी झालेली नाही. दरम्यान, 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीचा मुलगा म्हणजेच यशची बायको आरोहीची भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती. तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. अलिकडेच कौमुदी वलोकर (Kaumudi Walokar) लग्नबंधनात अडकली. आकाश चौकसेसोबत लग्न करुन तिने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अशातच अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोशल मीडियावर अतिशय छान पद्धतीने लिहून खास पोस्ट शेअर केली आहे. कौमुदीने ही पोस्ट रि-शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. आकाश चौकसेने लिहिलेल्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कौमुदी वलोकरचा पती आकाश चौकसेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नातील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "लग्नसंस्काराकडे मागे वळून बघताना मन कृतज्ञ भावनेने भरून गेले आहे. संस्कार जरी दोघांचा असला तरी पडद्यामागे शेकडो लोक निस्वार्थपणे आणि उत्साहाने काम करत असतात; मग ते पालक असोत, नातेवाईक असोत, की मित्रपरिवार! कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. तेव्हाच इतका देखणा सोहळा उभा राहतो. संगीतच्या तालमीपासून घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींची जुळवाजुळव, पाहुण्यांचे आदरातिथ्य, प्रचंड सामानाची खरेदी, ऐनवेळी येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक, आणि असंख्य इतर गोष्टींची काळजी घेत स्वतःची आवराआवरी करून वेळेचं गणित सांभाळणं हे सोपं काम नाही."
पुढे त्याने लिहिलंय, "त्यात अनेक लोक एकत्र येऊन विचार करणार, तेही दोन अनोळखी कुटुंबातले, म्हणजे गडबड गोंधळ होणारच. त्यातून मार्ग काढत काढत हे लग्नसंस्कार नावाचे अग्निदिव्य पार पाडण्यासाठी मदतीला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार...! तुमच्या सर्वांच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही .. त्या प्रेमाच्या ऋणातच राहणे उचित राहील." अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या पतीने शेअर केलेल्या पोस्टवर "प्रेम आणि कृतज्ञता...", अशी कमेंट करत कौमुदी वलोकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.