Gauri Kulkarni : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात होता. मालिकेतील अरुंधती, यश, आप्पा, अनघा या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर मालिकेने निरोप घेतला. दरम्यान, या मालिकेने कलाकारांनी नवी ओळख मिळवून दिली. या मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) घराघरात पोहोचली. अभिनेत्रीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती. गौरी ही यशची प्रेयसी होती. दरम्यान, नुकतीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिने शेअर केलेल्या व्हिडीओ बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टद्वारे तिने लिहिलंय, "आपण कधी मोठे झालो ना...? लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीची वाट पाहायचो. पेपर देऊन घरी आलो की दिवसभर फक्त खेळत बसायचो. ४-८ दिवस झाले की, ‘कंटाळा आलाय आई… काय करु बाबा..?’ असे प्रश्न विचारत आई बाबांना त्रास द्यायचो. आता आपला उन्हाळा असा नसतो. AC मध्ये बसलोय, मित्रांसोबत फिरायला जातोय हवं ते करतोय. पण, आपले आई-बाबा तसेच आणि तिथेच आहेत अजून. मी उन्हाळ्यात, आई बाबांना पापड कुरड्या बनवताना, माझ्या लहानपणापासून बघतेय आणि आजही जेव्हा मी उन्हाळ्यात घरी जाते तेव्हा तेच चित्र मला दिसतं. किती गोड ना..?
पुढे गौरीने आठवण सांगत लिहिलंय, "आपण ना पटपट मोठे होतो. पण आपले आई बाबा आपल्यासाठी ज्या गोष्टी लहानपणी करायचे. त्या ते अजूनही करत असतात. आपल्या मुलांना काय हवं, वर्षभर काय लागेल, हे सर्व त्यांना माहीत असतं आणि कितीही वय झालं तरीही त्या गोष्टी करणं ते सोडत नाहीत. त्यांची जबाबदारी ते कधीच टाकत नाहीत.आई बाबा असेच असतात. थंडीत मऊशार उब देणारे, चरचरीत उन्हात सावली देणारे आणि हो, उन्हाळ्यात न चुकता वर्षभर पुरतील एवढे पापड कुरडया करणारे. उन्हाळ्याची अशी तुमची कोणती आठवण आहे..?" अशी पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांच्या गावाकडील आठवणी ताज्या झाल्या आहेत.