अनेक कलाकारांचं मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. यासाठी ते ऑडिशन्स देतात, प्रचंड संघर्ष करतात. कित्येक महिने तर हातात एकही काम नसतं. हिंदी सिनेसृष्टीत काम करायचं एकच स्वप्न घेऊन ते मुंबईत काहीही करुन स्वत:चा उदरनिर्वाह करतात. मात्र एक मराठी अभिनेता असा आहे ज्याचं बॉलिवूड नाही तर साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं स्वप्न होतं. इतकंच नाही तर त्याने एक कन्नड सिनेमात मुख्य नायकाची भूमिकाही केली. त्याचं पुढे काय झालं? याचा खुलासा नुकताच त्याने केला आहे.
'लग्नानंतर होईलच प्रेम' या सध्या गाजत असलेल्या मालिकेत अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar) मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतंच विजयने 'पुढारी'ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "मी एक कन्नड भाषिक सिनेमा केला आहे. त्यात हिरोचीच भूमिका केली आहे. ती फक्त जरा अडकलीये. यावर्षी रिलीज करायचं ते म्हणत आहेत. ती झाली तर माझं स्वप्नच पूर्ण होईल. कारण इंडस्ट्रीत येतानाच खरं तर माझं स्वप्नच साउथमध्ये जायचं होतं. लॉकडाऊन जेव्हा संपला तेव्हा जसं लोक स्ट्र्गल करायला मुंबईत येतात तसं मी हैदराबादला गेलो. माझा तो प्लॅनच झाला होता. लॉकडाऊनमध्ये मी ऑनलाईन क्लासेस केले. तमिळ, कन्नड भाषा शिकलो. जसा लॉकडाऊन संपला मी गाडी काढली आणि थेट हैदराबादला पोहोचलो. कोणाशीही ओळख नाही काही नाही थेट तिथे गेलो. हॉटेलमध्ये राहिलो. गुगलवर आधीच सगळे पत्ते काढून ठेवले होते. लोकांना जाऊन भेटलो, प्रोफाईल दाखवलं. तेव्हाच तो कन्नड मधला सिनेमा मिळाला. 'अँब्युलन्स'नावाचा तो सिनेमा आहे."
विजय आंदळकरने 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू','पिंकीचा विजय असो' या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्याची 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका चांगलीच गाजत आहे. विजयने 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी','ढोल ताशे','७०२ दीक्षित' या सिनेमांमध्येही भूमिका साकारली आहे.