Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॉलोअर्स कमी म्हणून नाकारलं? 'बाळूमामा' फेम सुमीतने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 08:52 IST

मनोरंजनसृष्टीतलं धक्कादायक वास्तव

टीव्ही असो किंवा फिल्म इंडस्ट्री कुठेही कलाकारांचं जीवन खूप स्ट्रगलपूर्ण असतं. काम मिळवण्यासाठी त्यांना प्रचंड धडपड करावी लागते. एखादं काम मिळालं तरी नंतर दुसरा कोणता प्रोजेक्ट मिळेल की नाही याचं आश्वासन नसतं. पण आता तर नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. एखाद्या कलाकाराचे सोशल मीडियावर कमी फॉलोअर्स असतील तर या एका कारणामुळेही त्याला काम दिलं जात नाही. होय सध्या मनोरंजनसृष्टीत हेच घडतंय. याचा अनुभव 'बाळुमामा' फेम अभिनेता सुमीत पुसावळेला (Sumeet Pusavale) आला आहे.

'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' या लोकप्रिय मालिकेत बाळूमामांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे सध्या चर्चेत आहे. त्याने मनोरंजनविश्वातलं धक्कादायक वास्तव समोर आणलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुमीत म्हणाला, 'मी अनेक वर्ष बाळूमामाची भूमिका साकारत आहे. माझ्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेमही मिळतंय. अनेक जण मला आता बाळूमामा म्हणूनच ओळखतात. पण नुकताच मला असा अनुभव आला ज्यामुळे मी चकितच झालो. मी एका चित्रपटासाठी आणि म्युझिक अल्बमसाठी ऑडिशन दिली होती. माझी निवडही झाली होती. पण त्यांनी माझं सोशल मीडिया अकाऊंट चेक केलं. कमी फॉलोअर्स आहेत हे बघून त्यांनी चक्क मला रिजेक्ट केलं. मला काय बोलावं कळलंच नाही. हे माझ्यासाठी धक्कादायकच होतं. दुर्दैवाने कलाकारांचं भविष्य आता सोशल मीडियावर अवलंबून आहे. तुम्ही किता चांगलं काम करता यापेक्षा तुमचे फॉलोअर्स किती हे बघितलं जातंय. हे खरंच खूप वाईट आहे.'

सुमीत पुढे म्हणाला, 'आता मी पत्नीच्या मदतीने सोशल मीडियावर जास्तीत जास्त रिल्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आता हे गरजेचंच आहे.  हे काही प्रेशर नाहीए तर कामाचा भाग असल्यासारखं करावंच लागणार आहे.'

संत बाळूमामांच्या भूमिकेतून सुमीत घराघरात पोहोचला. तरुणपणीचे बाळूमामा आणि वयस्कर अशा दोन्ही भूमिका त्याने चोखरित्या पेलल्या. मात्र तरी एका क्षुल्लक कारणावरुन त्याला नवीन प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला हेच सध्याचं मनोरंजनसृष्टीतील वास्तव आहे.

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडिया